पुणे : भविष्यातील उत्पादनांची दिशा बदलणारे धोरण जाहीर | पुढारी

पुणे : भविष्यातील उत्पादनांची दिशा बदलणारे धोरण जाहीर

गणेश खळदकर

पुणे : भविष्यातील उत्पादनांची दिशा बदलण्यासाठी भारत सरकारकडून नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचे राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसह सर्वच क्षेत्रांत आता वस्तूनिर्मितीसाठी थ्रीडी प्रिंटिंग अर्थात त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी 2023 अखेरपर्यंत बाजारात 35.6 बिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. त्यात उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. पुढील काळात पर्यावरणपूरक, बाजाराशी जवळीक साधणारी आणि कमी वेळात ग्राहकांपर्यंत पोचणारी तसेच मोठ्या प्रमाणात एकदाच वस्तूंची निर्मिती केली जाणारी उत्पादन प्रक्रिया राहणार आहे. त्यामुळे त्रिमिती मुद्रण ही प्रक्रिया भविष्यातील उत्पादन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलवून टाकणार आहे. या प्रक्रियेत वस्तू किंवा उत्पादननिर्मिती करताना कच्च्या मालाची सूक्ष्म थरांच्या स्वरूपात भर घातली जाते.

यासाठी आभासी वास्तवाचा वापर करून उत्पादनांची प्रतिकृती तयार करण्यात येते आणि त्याची सूक्ष्म थरात विभागणी केली जाते. ज्यातून जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख क्लिष्ट अशा उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणे आणि उत्पादनक्षेत्राचे स्थैर्य टिकविणे शक्य होणार आहे. यात कच्चा माल कुठेच वाया जात नाही.

म्हणूनच भारत सरकारच्या अणुविद्युत आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर केले आहे. या धोरणातून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक उद्योगांना आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ विकास, तांत्रिक मार्गदर्शन करून या क्षेत्रात योगदानासाठी तयार करण्याचा उद्देश आहे. त्यासाठीच नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

धोरणाची फलनिष्पत्ती काय असणार…
– भारतकेंद्रित तंत्रज्ञानाची निर्मिती                                                                                                                                         – मटेरिअल, मशिन प्रोसेस, सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्स ज्यातून भारत एक वैश्विक केंद्र बनेल.
– नवउद्योगांची स्थापना होणार
– नवीन उत्पादनांची निर्मिती होणार
– वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रांचे निर्माण
– 1 लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती होणार

कोणत्या क्षेत्रात होणार त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर
– वाहननिर्मिती उद्योग
– अंतराळ उद्योग
– संरक्षण क्षेत्र
– अणुविद्युत अभियांत्रिकी
– आरोग्यसेवा
– उपभोक्ता वस्तूनिर्मिती

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी काय असणार आव्हाने
– कच्च्या मालाच्या गुणधर्मांचा अभ्यास करणे
– उत्पादननिर्मितीचा वेग वाढविणे
– नवीन तंत्रज्ञानाचा विकास
– उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे
– गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादननिर्मितीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण

त्रिमिती मुद्रणाने उत्पादनांची परिभाषा बदलत असून, ग्राहकाभिमुख, गुणवत्तापूर्ण, क्लिष्ट पण नवोत्तम अशा उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होत आहे. कच्च्या मालाचे संशोधन आणि उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी संशोधनाची गरज आहे. या धोरणाच्या माध्यमातून या सर्व प्रयत्नांना एक दिशा मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात या क्षेत्रात प्रशिक्षित अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतील.
                                                                   – प्रा. डॉ. गणेश काकांडीकर                                                                   संकुलप्रमुख, यंत्र अभियांत्रिकी एमआयटी

या राष्ट्रीय धोरणात प्रशिक्षित मनुष्यबळ विकास हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि यात विद्यापीठांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. चीनने सर्वांत आधी राष्ट्रीय त्रिमिती मुद्रण संस्थेची स्थापना करून आघाडी घेतली आहे. साऊथ कोरियाने 2018 मध्येच अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगसाठी राष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे भारताच्या या राष्ट्रीय धोरणाचे स्वागत आहे.
– प्रा. डॉ. सायली गणकर                                                                               कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ

फोटो – थ—ीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान नावाने सेव्ह आहे.
——————

Back to top button