शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: अनेक वर्षांपासून रखडलेल्या माळेगाव ते माळेगाव कारखाना या झैलसिंग रस्त्याचे आणि 22 फाटा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव तसेच संचालक, जिल्हा परिषद माजी सदस्या रोहिणी तावरे, दीपक तावरे, विश्वस्त वसंतराव तावरे, बंटी तावरे, रविराज तावरे, जयदीप तावरे आदी उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्वीच होणे गरजेचे होते. परंतु, पूर्वी हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत असल्यामुळे मागील तीन वर्षांपासून केंद्र शासनामार्फत मिळणारा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कार्यान्वित केल्याने रस्त्याचा निधी तातडीने उपलब्ध झाला, असे संभाजी होळकर यांनी नमूद केले.
माळेगाव ते माळेगाव कारखाना हा अत्यंत वर्दळीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. आता कारखान्याचा गाळप हंगाम महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी तातडीने काम सुरू करून दर्जेदार कामाची जबाबदारी ठेकेदारावर येऊन ठेपली आहे. रस्त्याच्या निविदेमध्ये कामाचा असलेला उल्लेख आणि त्याप्रमाणे दर्जेदार काम होणे एवढीच अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यासाठी जवळपास 5 कोटी 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
दै. 'पुढारी'चे धन्यवाद
माळेगाव ते माळेगाव कारखाना रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दै. 'पुढारी'ने वेळोवेळी आवाज उठवून सर्वसामान्यांच्या व्यथा मांडल्या आहेत, त्याचाच परिपाक म्हणून आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्याचे म्हणत अॅड. राहुल तावरे व प्रमोद जाधव यांनी
दै. 'पुढारी'चे आभार मानले.