

चाकण; पुढारी वृत्तसेवा: तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यासंदर्भात खेड तालुक्यातील नागरिकांनी चाकण एमआयडीसीत आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी (दि. 2) निवेदन दिले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे यांच्यासह विविध गावाचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे काम मंजूर असून, लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित शिष्टमंडळाला दिले.
चाकण औद्योगिक परिसरातील नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, येलवाडी, खालुंब्रे, महाळुंगे, खराबवाडी, कडाचीवाडी या ग्रामपंचायतींच्या वतीने चाकण-तळेगाव महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे यांनी दिली.
या वेळी मावळचे माजी आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यासह विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी चाकणमधील व्यापारी आणि उद्योजक यांनीही केंद्रीय मंत्री गडकरी यांना या भागांतील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याचे निवेदन दिल्याचे संदीप परदेशी व मच्छिंद्र गोरे यांनी सांगितले.