

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: 146 गावांना 454 कोटी रुपयांचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने 'हर घर जल' योजनेच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला. मात्र, त्याचे श्रेय घेण्याची विरोधकांची चाललेली धडपड पाहून किव करावीशी वाटते. त्यामुळे प्रत्येक गावच्या सरपंचांनी विरोधकांची लबाडी जनतेसमोर ठामपणे मांडावी, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि. 3) 1 कोटी 85 लाख रूपयांच्या 'हर घर जल' योजनेचा शुभारंभ व 7 कोटी 65 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. या वेळी भरणे म्हणाले, 'इंदापूर तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय जनतेच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी 2012 पर्यंतची वाट का पाहावी लागली? त्याआधी इंदापूर तालुक्यात या भागांमध्ये विकास का झाला नाही, असा माझा विरोधकांना सवाल आहे.
2012 नंतर इंदापूर तालुक्यातील मागासवर्गीय लोकांच्या घरापर्यंत शासनाच्या विविध योजना मी पोहोचविल्या आहेत. त्यामुळे जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. विरोधकांना विश्रांतीचा सल्ला जनतेने दिलेला असताना कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी ते धडपड करीत आहेत.' एखाद्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या कामाचा फोटो काढून ते काम निकृष्ट झाले आहे, अशी टीका माझ्यावर करतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील निर्माण झालेले रस्त्याचे जाळे, याकडे मात्र ते डोळेझाक करतात.
इंदापूर तालुक्यातील गावागावांत चाललेला विकास विरोधकांना पाहवत नाही, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांच्यावर दत्तात्रय भरणे यांनी निशाणा साधला. या वेळी हनुमंत कोकाटे, नंदकुमार रणवरे, सरपंच राजेंद्र चांगण, उपसरपंच शोभा कवितके, ग्रामसेवक शशिकांत जाधव, संजय चव्हाण, गोतोंडीचे सरपंच गुरुनाथ नलवडे, छाया पडसळकर, अप्पा पाटील आदींसह इतर उपस्थित होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी मनोगत व्यक्त केले व गजानन लंबाते यांनी प्रास्ताविक केले.