पोंढेतील धनगर वस्तीवर अडचणींचा डोंगर; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

पोंढे (ता. पुरंदर) येथील धनगर वस्तीवर जाणार्‍या रस्त्याची झालेली दुरवस्था दाखवताना वस्तीवरील ग्रामस्थ.
पोंढे (ता. पुरंदर) येथील धनगर वस्तीवर जाणार्‍या रस्त्याची झालेली दुरवस्था दाखवताना वस्तीवरील ग्रामस्थ.

नायगाव; पुढारी वृत्तसेवा: प्यायला स्वच्छ पाणी नाही, पक्की घरे नाहीत, कुठल्याच योजनेचा लाभ नाही, पालापर्यंत (निवारा) जायला पक्क्या स्वरूपाचा रस्ता नाही, फक्त निवडणुकीपुरते आमच्याकडे नेत्यांचा ओघ असतो. अशा एक ना अनेक अडचणींचा डोंगर उभा ठाकलेल्या पोंढे (ता. पुरंदर) येथील धनगर बांधवांच्या मूलभूत समस्यांची शासनाने दखल घ्यावी; अन्यथा मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन करण्याची नामुष्की आमच्यावर ओढवेल, अशी खंत येथील बांधवांनी दै. 'पुढारी'शी बोलून दाखवली.

पोंढे गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या धनगर वस्तीवर पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, आजही डोंगर कपारीतून पिण्याच्या पाण्याची शोधाशोध करावी लागते. पक्क्या स्वरूपाचा रस्ता देखील नाही. खाचखळगे अन् काटेरी झुडपातून वाट शोधावी लागते. रात्री-अपरात्री रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहचवणे शक्यच नाही. राहण्यासाठी अनेकांना पक्की घरे नाहीत. येथील नागरिकांच्या अनेक पिढ्यांनी पालामध्येच आपले आयुष्य काढले आहे. घरकुलसारख्या योजना अद्यापपर्यंत या समाज बांधवांपर्यंत पोहचल्या नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे.

धनगरवस्ती येथील नागरिकांचा मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय आहे. उन्हाळ्यात चार्‍याची समस्या असल्याने चार्‍याच्या शोधात उन्हाळ्यात बाहेरगावी जावे लागते. पाऊस पडल्यानंतर मात्र सर्व बांधव येथेच वास्तव्यास येतात. या वस्तीवर अनेक नागरिक कायमस्वरुपी राहतात. पक्का रस्ता, पाण्यासाठी वणवण आणि पक्क्या स्वरूपाचा निवारा नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. शनिवारी (दि. 3) येथील नागरिकांनी मूलभूत सुविधांबाबत नाराजी व्यक्त करत लवकरच आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. या वेळी संतोष वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, नारायण कोकरे, भाऊसो वाघमोडे, किसन वाघमोडे, नाना वाघमोडे, बारकू कोकरे, परशुराम लोखंडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news