कोरेगाव पार्क : भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण | पुढारी

कोरेगाव पार्क : भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

कोरेगाव पार्क; पुढारी वृत्तसेवा: चिकन दुकानातील टाकाऊ मांस रस्त्यांवरील कुत्र्यांना खावयास दिल्याने मंगळवार पेठ, सोमवार पेठ या भागांत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या वाढीव उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. जुना बाजार परिसरातील रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. दुचाकी व चार चाकी वाहनांवर कुत्री धावून येतात. त्यामुळे वाहनचालक भयभीत होताना पाहावयास मिळतात.

अचानक कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाहनचालकांना किरकोळ दुखापतीच्या घटना घडत आहेत. स्थानिक महिला, लहान मुले हैराण झाली आहेत. जन्म- मृत्यू कार्यालयाजवळून विद्यार्थ्यांचे येणे-जाणे असते. या विद्यार्थ्यांनाही या कुर्त्यांपासून जीव मुठीत घेऊन जावे लागते. रात्रीच्या काळोखात कुत्र्यांचा हल्ला होतो. नायडू रुग्णालयाच्या आवारात श्वान नसबंदी केंद्र आहे, तरीही मंगळवार पेठ भागात श्वान वाहन फिरत नाही. अनेकदा कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना परत आहे त्याच भागातील रस्त्यावर सोडले जाते. या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली असल्याचे स्थानिक नागरिक विलास कांबळे यांनी सांगितले.

Back to top button