

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाप्पांच्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शनिवार (दि. 3) अखेर तब्बल एक हजार 954 जणांना नोटीस बजावून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात आगाऊपणा कराल, तर याद राखा, असाच काहीसा संदेश पोलिसांनी कारवाईतून दिल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पहावयास मिळत आहे.
सार्वजनिक गणेशमंडळांनी आरास करण्यापेक्षा भव्य स्वरूपात विसर्जन मिरवणुका काढण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने मंडळांसमोर यंदा पैशाची देखील अडचण नाही. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना नोटीस बजावून पोलिसांनी एक प्रकारे तंबीच दिली आहे. शनिवारअखेर तब्बल एक हजार 954 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगार सैरभैर झाले आहेत.
पिंपरी-चिचंवड शहर परिसरात पोलिस रेकॉर्डनुसार एक हजार 742 सार्वजनिक मंडळ आहेत. यातील आज म्हणजेच पाचव्या दिवशी 28 मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. तर, सातव्या दिवशी 439, आठव्या दिवशी 07, नवव्या दिवशी 205 आणि दहाव्या दिवशी सर्वाधिक म्हणजेच एक हजार 54 मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. दरम्यान, काही समाजकंटक जाणीवपूर्वक मिरवणुकांमध्ये जुनी भांडणे उकरून काढतात. तसेच, काहीजण वचपा काढण्याच्या तयारीत असतात. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे यावर अंकुश बसण्यास मदत होते.
गुन्हे शाखेसह सर्व पथके उतरणार रस्त्यावर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात चोख बंदोबस्त तैनात आला आहे. आयुक्तालयातील मनुष्यबळ कमी असल्याने यंदा महासंचालक कार्यालयाकडून अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. यामध्ये मुंबई आणि प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे. तसेच, आयुक्तालयातील गुन्हे शाखेसह सर्व पथके बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रचलित कायद्यानुसार मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आली आहेत. मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आला आहे. नागरिकांनादेखील दरम्यानच्या काळात काही अनुचित प्रकार आढळ्यास नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.
– मंचक अप्पर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
पाच टोळ्यांवर मोक्का, तर चारजण होणार स्थानबद्ध
बाप्पांच्या मिरवणूका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई सोबतच काहींना मोक्का आणि स्थानबद्धतेचा ढोस पाजण्याच्या तयारीत आहेत. आयुक्तालयातील पिंपरी, चिंचवड, चाकण, देहूरोड आणि महाळुंगे येथील पाच जणांवर मोक्का आणि पिंपरी, आळंदी, चाकण सांगवी येथील चौघांना स्थानबद्ध करण्याच्या हालचाली सुरु आहेत.