पुणे : आजपासून विसर्जनासाठी शहरात 150 फिरते हौद | पुढारी

पुणे : आजपासून विसर्जनासाठी शहरात 150 फिरते हौद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने आजपासून (रविवार) म्हणजेच गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवसापासून 150 फिरते विसर्जन हौद कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. याशिवाय बांधीव हौद, पाण्याच्या लोखंडी टाक्या, मूर्ती दान व मूर्ती संकलन केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी सांगितले.

जल्लोषपूर्ण व उत्साही वातावरणात आगमन झालेल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेने विविध स्तरावर तयारी केली आहे. नागरिकांनी बाप्प्याचे विसर्जन जलस्त्रोतांमध्ये करू नये, म्हणून विसर्जनाच्या पाचव्या दिवसापासून म्हणजे आजपासून 150 फिरते विसर्जन हौद कार्यान्वीत ठेवण्यात येणार आहेत, याशिवाय पालिकेने शहरात बांधीव हौद आणि 388 पाण्याच्या लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे.

विसर्जनाच्या सर्व ठिकाणी मूर्ती दान केंद्र, मूर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या केंद्रांची क्षेत्रीय कार्यालय निहाय माहिती व यादी महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली आहे. कोणीही बाप्पाची मूर्ती व निर्माल्य नदीपात्र, तलावात व इतर जलस्त्रोतांमध्ये टाकू नये, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

Back to top button