पुणे : जिवंत देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची तुफान गर्दी; विकेंडचा मुहूर्त साधत गणरायाचे दर्शन | पुढारी

पुणे : जिवंत देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची तुफान गर्दी; विकेंडचा मुहूर्त साधत गणरायाचे दर्शन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने अवघा आसमंत दणाणून सोडत गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी शनिवारी भाविकांनी आवर्जून हजेरी लावली. सायंकाळच्या पावसाच्या जोरदार हजेरीमुळे गर्दीचे प्रमाण कमी असले, तरी भाविकांमधील उत्साह तसूभरही कमी झाला नाही आणि पाऊस थांबताच गर्दी वाढल्याचे चैतन्यमयी चित्र नजरेस पडत होते.

एकाच गणरायाची अनेक रुपे आणि मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्यभागात गणेशभक्तांची गर्दी झाली होती. यावेळी सेल्फी विथ बाप्पा, फेसबुक लाईव्ह तसेच बाप्पाचे स्टेटस ठेवणारी तरूणाई विविध ठिकाणी दिसून येत होती. बाप्पाचे मोहक रुप साठवून ठेवण्यासाठी गर्दीतून अधूनमधून मोबाईलही उंचावले जात होते. लहान मुलांना गाडीवर बसवून विविध मंडळांच्या समोर रस्त्यावरच वाहन उभे करून नागरिक देखावे पाहणे पसंत करत होते.

ग्रामदैवत कसबा गणपतीसह मानाच्या सर्वच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. त्यामुळे मध्यवस्तीतील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने गणेशमय झाल्याचे पाहायला मिळाले. लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊन देखावे पाहण्यासाठी शहराच्या विविध भागांमधील रहिवाशांसह जिल्हा व परगावाहून आलेल्या भाविकांनी शनिवारी सायंकाळपासूनच गर्दी केली.

मानाच्या गणपतींसह काही प्रमुखगणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बहुतांश भाविकांची पावले सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ यांसारख्या मध्यवस्तीसह शहराच्या पूर्व भागातील देखावे पाहण्यासाठी प्राधान्य दिले. बहुतांशी, मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. सायंकाळी सहानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. स्वयंसेवी संस्था-संघटनांचे कार्यकर्तेही गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलिसांना सहकार्य करत होते. मंडळांचे कार्यकर्तेही गर्दीच्या नियंत्रणासाठी खबरदारी घेताना दिसत होते.

Back to top button