मंचर : पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

मंचर : पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

मंचर; पुढारी वृत्तसेवा: ता. आंबेगाव येथील सूर्यकांत दत्तात्रय कराळे (वय 40) या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंचर पोलिस व रुग्णवाहिका चालक यांनी तत्काळ त्याला मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. 2) रात्री आठ वाजेच्या सुमारास मंचर पोलिस ठाण्याच्या बाजूलाच सूर्यकांत दत्तात्रय कराळे या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरिकांनी सूर्यकांत दत्तात्रय कराळे यांच्या अंगावर पाणी टाकून आग आटोक्यात आणली व या घटनेबाबत पोलीस ठाण्याला माहिती कळविली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. याबाबत पोलीस जवान राजेश नलावडे यांनी रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांना माहिती दिली.

सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस जवान तनपुरे, रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी या व्यक्तीस मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करीत याबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी कराळे यांना पुणे येथे नेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. कराळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत मंचर पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button