निरगुडसर येथे शेतामध्ये आढळला मृत बिबट्या | पुढारी

निरगुडसर येथे शेतामध्ये आढळला मृत बिबट्या

मंचर; पुढारी वृत्तसेवा:  निरगुडसर येथील एका शेतामध्ये शनिवारी (दि.3) सकाळी बिबट मादी मृतावस्थेत आढळून आली. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला. मेंगडेवाडी (थोरातमळा) -निरगुडसर रस्त्यालगत बाळासाहेब प्रभाकर मेंगडे यांच्या रिकाम्या शेतात पाच ते सहा महिन्यांची बिबट मादी मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मृत बिबट मादीवर हिस्र प्राणी किंवा बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन कर्मचारी दशरथ रामभाऊ मेंगडे यांनी व्यक्त केला. या ठिकाणी अनेक दिवसांपासुन बिबट्याचा वावर आहे. त्यातच बिबट मादी मृतावस्थेत आढूळन आल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी, तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

 

Back to top button