बारामती; पुढारी वृत्तसेवा : आम्ही मागील दोन निवडणूका बारामतीतून हरलो. पण २०२४ ला त्याची पुनरावृत्ती होणार नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आता दुसरा वायनाड पहावा असे माजी मंत्री, आमदार राम शिंदे म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार शिंदे म्हणाले, २०१४ आणि २०१९ ची निवडणूक आम्ही हरलो. २०२४ चा उमेदवार लवकरच ठरेल. पक्षाने माझ्यावर प्रभारी पदाची जबाबदारी त्यासाठी दिली आहे. २०१४ ते २०२४ या मधल्या काळात मोठा बदल झाला आहे. आम्ही अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकून दाखवू.
राष्ट्रवादचे रोहीत पवार यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टिका केल्या. कर्जत-जामखेडमध्ये पानंद रस्त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणे थेट टाळले आहे. तीन प्रकरणात त्यांना नोटीसा आल्या असल्याचे समजते आहे. त्यांनी चौकशीला सामोरे जात सहकार्य केले पाहिजे. पण ते म्हणतात चौकशी करायची गरज नाही. त्यांना नोटीस आली आहे, त्यांनी त्यावर उत्तर दिले पाहिजे. पण त्यांचा अजून अभ्यासच चालूच आहे. अभ्यास करुन ते इडीला उत्तर देतील. खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणे इडीला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मोदी सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक राज्य आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकतो आहोत. मोदींचा करिश्मा कमी झालेला नाही. विरोधकांकडे तर मुद्दाच शिल्लक नाही. २०२४ ला पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असेही आमदार शिंदे म्हणाले.
हेही वाचा