कुरकुंभ पोलिस मदत केंद्राला हवा कर्तबगार अधिकारी | पुढारी

कुरकुंभ पोलिस मदत केंद्राला हवा कर्तबगार अधिकारी

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: पोलिस मदत केंद्रासाठी कर्तबगार पोलिस अधिकार्‍याची गरज असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. येथील बेकायदेशीर व अवैध धंदे, गुन्हेगारी, चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुरकुंभ पोलिस मदत केंद्रअंतर्गत अनेक लहान- मोठी गावे, वाड्यावस्त्या आहेत. कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी, पांढरेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

सुप्रसिद्ध श्री फिरंगाई देवीचे मंदिरामुळे भाविकांची सतत रहदारी असते. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभरपेक्षा अधिक रासायनिक उत्पादन कंपन्या आहेत. या कंपन्यात स्फोट, अपघात, आगीच्या घटना वारंवार घडतात. रसायन चोरीच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. या चोर्‍यांचा शोध लागत नाही, तपासाला गती नाही, अजून काही चोरटे मोकाट आहेत.

पुणे- सोलापूर, बेळगाव- मनमाड राष्ट्रीय महामार्ग येथून गेले असून अपघाताचे सत्र कायम सुरू असते. अपघाताचे अनेक गुन्हे दाखल आहेत. खून, घरगुती वाद, जिवे मारण्याची धमकी देणे, एटीएम मशीन फोडणे, दुकाने फोडणे, प्रवासी, वाहनचालकांना मारहाण करून लुटणे, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, वेश्याव्यवसाय असे अनेक गंभीर गुन्हे घडलेले आहेत. गुन्ह्यांची संख्या आणि तपास याचा ताळमेळ बसत नाही. परिणामी पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचा समज नागरिकांमध्ये होत आहे.

सध्या अवैध धंदे वाढले असून या धंदेवाल्यांना कुरकुंभ पोलिसांची भीती राहिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आर्थिक देवाणघेवाणीचे नियोजन करीत आता ऊठसूट कोणीही या धंद्याकडे वळत आहे. अवैध धंद्याबाबत ग्रामसभेतदेखील चर्चा करण्यात आली. अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी योग्य वेळी प्रयत्न केले पाहिजेत. सध्याच्या स्थितीत तसे होत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांची जणू काय स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.

कुरकुंभमध्ये बेकायदेशीर व अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत, ते तातडीने बंद करावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
                                                               – उमेश हनुमंत सोनवणे
                                                        विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, कुरकुंभ.

Back to top button