मुळशी : पुरावा नष्ट केल्याप्रकरणी हॉटेल चालकास अटक | पुढारी

मुळशी : पुरावा नष्ट केल्याप्रकरणी हॉटेल चालकास अटक

मुळशी : हिंजवडी जवळ माण-म्हाळुंगे रस्त्यालगत १७ ऑगस्ट रोजी एका बालाजी नावाच्या व्यक्तीचा खून करून त्यास कचऱ्याच्या ढिगात फेकून देण्यात आल्याची घटना पुढे आली होती. याप्रकरणी हॉटेलचालक बाबासाहेब उर्फ बाबू साखरे (रा. हिंजवडी) यास खुनाचा पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. मयत व्यक्तीचा चेहऱ्याची व तोंडाची छिन्न विछिन्न अवस्था, डावा हात तुटलेला व पायावरील गंभीर जखमा आढळून आल्याने हा खून असल्याचे निष्पन्न होत होते. यामुळे पोलिसांनी पुढील सूत्र हलवत आरोपीचा शोध घेतला.

त्यानंतर आरोपी निलेश धुमाळ (रा. उस्मानाबाद) व स्वप्नील थोरात (रा. कराड, सातारा) यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती. दारू पिण्याच्या वादातून निलेश व बालाजी यांचे हिंजवडी येथील हॉटेल अशोक कंट्री बार येथे दारू पित असताना भांडण झाले होते. त्यात बालाजी यास निलेशने दारूची बाटली आणि काठीच्या साहाय्याने जबर मारहाण केली होती. यानंतर हॉटेलचा मॅनेजर किशोर शिंदे, अखिलेश शिंदे व धर्मेंद्र यादव यांनी मयत बालाजी यास म्हाळुंगे रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगात टाकून दिले.

या घटनेचा अधिक तपास केला असता, शिंदे व त्याच्या सहकार्यांना बाबू साखरे याने वेळोवेळी सूचना केल्या असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी साखरे याला देखील पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.
या घटनेतील किशोर शिंदे, अखिलेश शिंदे व धर्मेंद्र यादव अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.

Back to top button