

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिकांच्या निवडणुका व कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सवाचा सण निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजनिक तसेच घरोघरी लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर फूल, नारळ, फळे, मिठाई, विद्युत माळा व दागिन्यांच्या उलाढालीत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत कधी बंद तर कधी नियमावलीमुळे अडचणींचा सामना कराव्या लागणार्या व्यावसायिकांना विघ्नहर्त्यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
रोज तीन लाखांहून अधिक नारळ
गणेशोत्सवात पूजेसह मोदकासाठी नारळाची आवश्यकता भासते. त्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधून शहरातील बाजारात नवा नारळ, मद्रास, पालकोल, साफसोल नारळ दाखल होतात. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट व निर्बंधामुळे शहरातील गुलटेकडी मार्केटयार्डातील दररोजची आवक एक लाखांवर आली होती. तसेच, शहरातील धार्मिक स्थळे, मोदक बनविणार्यांसह जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांवरून होणारी मागणीही कमी होती.
मात्र, यंदा निर्बंधमुक्त उत्सव होत असल्याने बाजारात दररोज तीन ते चार हजार पोत्यांमधून जवळपास तीन लाखांहून अधिक नारळ बाजारात येत आहेत. धार्मिक विधी, तोरण यासाठी तामिळनाडूच्या वाणी अंबाडी भागातून येणार्या नव्या नारळास, तर मोदकांसाठी साफसोल व मद्रास नारळास चांगली मागणी आहे. याखेरीज, जिल्ह्याच्या विविध भागांतील धार्मिक स्थळांवरूनही नारळांना चांगली मागणी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत नारळ उपलब्ध आहेत.
नारळ शेकडा दर
मद्रास 2 हजार 600 ते 2 हजार 700
पालकोल 1 हजार 450 ते 1 हजार 550
नवा नारळ 1 हजार 300 ते 1 हजार 500
साफसोल 1 हजार 500 ते 2 हजार 500
हारासाठी झेंडू, गुलछडी अन् शेवंती
गणरायाच्या दैनंदिन पूजेवेळी लागणार्या हारासाठी झेंडू, गुलछडी अन् शेवंतीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विविध भागांतून 50 हून अधिक प्रकारातील फुले तसेच सजावटीशी संबंधित घटक लाखो किलोंच्या स्वरूपात फुले बाजारात येत असतात. कोरोनाच्या सुरवातीला लॉकडाऊनमुळे बसलेला फटका त्यानंतर गेल्यावर्षी लॉकडाऊन कधी उघडेल तसेच त्यानंतर काय परिस्थिती असेल, असा प्रश्न फुल उत्पादकांसह विक्रेत्यांना होता.
नियमित उत्पादक करणार्यांनी थोड्या प्रमाणात लागवड केली. परिणामी, गेल्यावर्षी शेवंती, झेंडूला चांगले दर मिळाले. यंदाही चांगले दर मिळतील या अनुषंगाने शेतकर्यांनी लागवड केली. गेल्यावर्षी एवढा पाऊस नव्हता. यंदा गणेशोत्सवाच्या सुरवातीच्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे भिजलेल्या मालाचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. मात्र, गणेशोत्सव असल्याने या फुलांनाही चांगले दर मिळत आहेत. यंदा मात्र गाव खेड्यातूनही खरेदीसाठी खरेदीदार बाहेर पडले आहेत. परिणामी फुलांना चांगली मागणी होत आहे.
गणरायासाठी मोदक अन् गौरीसाठी फराळ
गणरायाच्या आगमनानंतर उकडीचे, तळणीसह माव्याच्या मोदकांच्या मागणीत वाढ झाली आहे. माव्याचे, उकडीचे, तळणीच्या मोदकांसह चॉकलेट, पान, रसमलाई, केशर-मावा, ओरिओ, रोझ-गुलकंद, ड्रायफ्रूट, अंजीर, श्रींखड यांसारखे विविध प्रकारचे मोदक बाजारात दाखल झाले आहेत. – दररोज जवळपास दीड लाखाहून अधिक उकडीच्या तर हजारो किलो फ्लेवर्स मोदकांची विक्री.
मोदकांमध्ये उलाढाल वाढणार
घरगुती, बचत गटाच्या महिलांचा पुढाकार घरगुती, सार्वजनिक गणरायाची आभूषणे कोरोनामुळे गणेशोत्सवात सोन्या-चांदीच्या आभूषणांना मागणी घटली होती. यंदा याउलट परिस्थिती आहे. कामधंदे सुरू झाल्याने परिस्थिती पूर्व पदावर आल्याने सोन्या-चांदीच्या आभूषणांना चांगली मागणी आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कारागिरांनी आकर्षक डिझाईनमध्ये मोदक, रत्नजडित मुकुट, तोडे, जानवे, मूषक, दुर्वाहार, कडे, बाजूबंद, पानसुपारी, जास्वंदीचा हार, मोत्यांचा हार, त्रिशूळ, सोंडपट्टी, शेला, भीकबाळी, छत्री, उपरणे आदी सोन्या-चांदीमधील आभूषणे घडविली आहेत.
गणपती, गौराईसाठी फळावळ
उत्सवादरम्यान गणपती व गौराईच्या पूजेसाठी फळ फळावळ वापरण्यात येते. त्याअनुषंगाने सफरचंद, मोसंबी, डाळींब, चिक्कू, केळी, संत्री, सीताफळ आदी फळांना मोठी मागणी राहते. दीड, पाच तसेच दहा दिवसांच्या अनुषंगाने बाजारात फळांची खरेदी करण्यात येते. दीड दिवसांच्या गणपतीच्या फळांच्या वाटेत सीताफळाचा समावेश असतो. तर पाच ते दहा दिवसांच्या गणपतीसाठी जास्त दिवस टिकणार्या फळांचा वाटा घेण्याकडे कल असतो.
गतवर्षी उत्सवाला अपेक्षित प्रोत्साहन नसल्याने फळांची आवक व मागणी दोन्हीमध्ये घट होऊन उलाढाल मंदावली होती. यंदा मात्र फळांना चांगली मागणी आहे. सत्तर टक्के पीओपी तर उर्वरित शाडू, मातीच्या मूर्ती दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात पीओपीच्याच मूर्तींचा बोलबाला दिसून आला. सुरवातीला प्रशासनाने कारवाई सुरू करण्यात आल्याने पीओपी मूर्तींच्या रंगकामाला ब्रेक बसला होता. अखेरच्या टप्प्यात प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्यानंतर मूर्तीकारांनी रंगकामाला सुरवात केली. कमी वेळ मिळाल्याने यंदा नेहमीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात आले.