पुणे : उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर; एलईडी दिवे, फुलांच्या मखरात बाप्पा विराजमान | पुढारी

पुणे : उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर; एलईडी दिवे, फुलांच्या मखरात बाप्पा विराजमान

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिवंत, पौराणिक देखाव्यांसह बालचमूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून रास्ता पेठ परिसरात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. परिसरातील बहुतांश मंडळांनी साधी सजावट करून लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
रास्ता पेठेतील वीर तानाजी मंडळ ट्रस्ट (सत्यवीर संघ) च्या वतीने बालचमूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, ऑर्केस्ट्रॉ तसेच जादूगार रघूवीर यांचे जादूचे कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संतोष कामत यांनी सांगितले.

कै. रवींद्र नाईक चौक मित्रमंडळाच्या वतीने रस्ते अपघात जनजागृतीपर जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. संभाजी मित्रमंडळ (ट्रस्ट)ने साकारलेला कृष्णाचा स्थिर देखावा लक्षवेधी ठरत आहे. तर सूर्योदय मित्रमंडळ, कबड्डी संघाने केलेला कार्तिकेय स्वामीची पृथ्वी प्रदक्षिणेचा हलता देखावा परिसरातील आकर्षण ठरत आहे. आझाद तरुण मंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

परिसरातील रास्ता पेठ श्री सार्वजनिक नायडू गणपती मंडळाची शारदेसोबत विराजमान झालेली गणेशमूर्ती व सोबतीला सिंह व मयूराची उपस्थिती तसेच जागृत गणपती मंडळ ट्रस्टची सात फुटांची भव्य गणेशमूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठा मित्रमंडळाने वारली शैलीतील चित्र साकारून कुडाच्या घरात गणेशमूर्ती स्थापन केली आहे.

याखेरीज, परिसरातील रास्ता पेठ जवाहर मंडळ, प्रताप मित्रमंडळ, स्वराज्य मित्रमंडळ, श्री मल्हारनाथ तरुण मंडळ, श्री गणेश मित्रमंडळ, विकास तरुण मंडळ (स्वराज्य प्रतिष्ठाण), सत्यजीत तरुण मंडळ, राष्ट्रीय हिंद मंडळ, सुभाष तरुण मित्रमंडळ, वीर नेताजी मित्रमंडळ, मराठा मित्रमंडळ, जय हिंद गणेश मित्रमंडळ ट्रस्ट आदी मंडळांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे. एलईडी दिवे, फुले तसेच विविध साहित्यांच्या मखरांमध्ये या मंडळांच्या गणेशमूर्ती विराजमान झाल्या आहेत.

रस्ते अपघातावर जिवंत देखावा
रास्ता पेठेतील कै. रवींद्र नाईक चौक मित्रमंडळाच्या वतीने रस्ते अपघातावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. रस्ते अपघाताकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधणारा हा देखावा पाहण्याजोगा आहे. पाच ते सहा कलाकारांकडून साकारलेला हा देखावा वाहनाचा वेग कमी करून, रस्ते सुरक्षित करूया, हा सामाजिक संदेश देऊन जातो.

आवर्जून पाहावे असे

अष्टविनायक मित्र मंडळ, नवी पेठ : गानसम्राज्ञी लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारा देखावा.
सार्वजनिक चिंचेची तालीम मंडळ ट्रस्ट, शुक्रवार पेठ ः आकर्षक विद्युत रोषणाई देखावा.
हिराबाग मित्र मंडळ ः शिवालय देखावा.
वस्ताद शेखचंद नाईक तालीम मंडळ, मिसाळ चौक ः गजमहल देखावा.
शाहू चौक मित्र मंडळ, शुक्रवार पेठ ः गणेश महल देखावा.
अकरा मारुती चौक, शुक्रवार पेठ ः आकर्षक ‘हवामहल’ देखावा.
अकरा मारुती कोपरा, शुक्रवार पेठ ः यंदा ‘गजमहल’ देखावा.
श्री लाकडी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ ः भारतरत्न पुरस्कारार्थींचा देखावा.
श्री शिवाजी चौक मित्र मंडळ, शुक्रवार पेठ ः शिवरथामध्ये स्वार झालेले बाप्पा.
जय हनुमान मित्र मंडळ, खडकमाळ आळी ः ‘अहिरावणाचा वध’ हा पौराणिक हलता देखावा.

Back to top button