पिंपरी : दोन एक्सप्रेस फीडर, तरीही पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

पिंपरी : दोन एक्सप्रेस फीडर, तरीही पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रात दोन एक्सप्रेस फीडर असतानाही वीजप्रवाह खंडित होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस ही अडचण निर्माण झाली. पंपिंग पुरेशा प्रमाणात न झाल्याने शुक्रवारी शहरात अपुरा पाणीपुरवठा करण्यात आला. महापालिकेकडे कायमस्वरुपी उपाययोजनेचा अभाव असल्याने हे चित्र निर्माण होत आहे.

अर्धा तास कमी पाणी सोडले
महापालिकेकडून शहरासाठी दररोज सरासरी 490 ते 500 दशलक्ष लिटर इतके पाणी पवना नदीवरील रावेत जलउपसा केंद्रातून उचलले जाते. हे पाणी शुद्ध करण्यासाठी निगडी-प्राधिकरण, पेठ क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. वीजपुरवठ्यात आलेल्या व्यत्ययामुळे गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर पुरेसे पंपिंग न झाल्याने शुक्रवारी अपुरा पाणीपुरवठा करण्यात आला. तीन तास पाणी सोडल्या जाणार्‍या भागात अडीच तासच पाणी सोडण्यात आले. पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

वडमुखवाडी, चर्‍होली, मोशीत अपुरा पाणीपुरवठा
वडमुखवाडी, चर्‍होली, मोशी, डुडुळगाव, चोवीसावाडी पेठ क्रमांक 10 येथील पंपहाऊसमध्ये गुरुवारी दुपारी दीड वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्री आठ वाजता सुरळीत सुरू झाला. जवळपास साडेसहा तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे वडमुखवाडी, चर्‍होली, मोशी, डुडुळगाव, चोवीसावाडी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पंपिंग कमी झाल्याने या भागातही आज सकाळी अपुरा पाणीपुरवठा झाला.

पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे कारण…
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रात उच्च विद्युत प्रवाह आहे. 9 हजार केव्ही इतका त्याचा भार आहे. येथे 2 एक्सप्रेस फीडर तर, एक जनरल फीडर आहे. येथील वीजपुरवठा ‘ड्रीप’ झाल्यानंतर पंप पूर्ववत सुरू करणे आणि त्या माध्यमातून पंपिंग करणे, यासाठी वेळ लागतो. पर्यायाने, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. 9 हजार केव्ही भार जास्त असल्याने तेवढ्या क्षमतेचा जनरेटर ठेवता येत नाही, अशी माहिती सह-शहर अभियंता (विद्युत) बी. वाय. गलबले यांनी दिली.

Back to top button