

बारामती; पुढारी वृत्तसेवा: यापूर्वी पंतप्रधानांसह अनेक मान्यवर आले, त्यांचे आम्ही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले, तरी त्यांचेही स्वागत आहे. बारामतीत कोणीही आले, तरी इथली जनता त्यांना हवे तेच करते, हा गेल्या 55 वर्षांचा अनुभव आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौर्यावर येत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनाच नव्हे, तर देशातील कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्यात वेगळे काही नाही. ते महाराष्ट्रात येत असले, तरी त्यामुळे पत्रकार 'पॅनिक' का होताहेत? हे मला कळलेले नाही.
राज ठाकरे यांना अनेक मंत्री भेटत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, त्यांना कोणी भेटले, तर त्यात वाईट वाटायचे कारण काय? मीही अनेकदा त्यांना भेटलो आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आमची राजकीय मते वेगवेगळी असली, तरी शेवटी मित्रत्वाचे संबंध असू शकतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंबंधीच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका. सगळे जण खंबीर आहेत. जो-तो आपल्या पक्षाबाबत विचार करीत असतो.
कोणाच्या पाच पैशाला मिंदा नाही…
निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण ठेकेदारांच्या भल्यासाठी केले जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. त्यावर पवार यांनी, 'मी कोणाच्या पाच पैशाला मिंदा नाही. तुम्हाला असं वाटता का? तुम्ही किती वर्षांपासून अजित पवारला ओळखता? आता बारामतीत सुरू असलेली कामे टेंडरसाठी चाललीत का?' असे उलट सवाल पवार यांनी पत्रकारांना केले. 'बाहेरून येऊन कोणीही काहीही बोलेल. उचलली जीभ लावली टाळ्याला. त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे.
परंतु, कोणाला किती महत्त्व द्यायचं हे बारामतीकरांना माहिती आहे. मला बारामतीकर पहिल्यापासून ओळखतात. मी कोणाच्या पाच पैशाला मिंदा नसतो.' पत्रकारांनो, असले धंदे बंद करा 'हा इकडे येणार, त्यावर तुमचं मत काय आहे? ते असे म्हणाले, त्यावर तुमचे मत काय आहे? असले प्रश्न विचारण्याचे धंदे बंद करा. विकासाबाबतीत काही प्रश्न विचारा, चर्चा करा. एवढा सगळा कायापालट सुरू आहे, त्यावर तुम्ही 'ब्र' शब्द काढत नाही,' अशा शब्दांत पवार यांनी या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना सुनावले.