पुणे : स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी होऊ लागले… | पुढारी

पुणे : स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी होऊ लागले...

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना आटोक्यात आला; मात्र स्वाइन फ्लूने डोके वर काढले. गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण या दोन महिन्यांमध्ये आढळून आले. मात्र, आता पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील एक आठवड्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण 25-30 टक्क्यांनी कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पुण्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले. स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया अशा आजारांचा संसर्ग वाढला. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.

22 ते 26 ऑगस्ट या चार दिवसांमध्ये 100 हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर मात्र रुग्णांची संख्या काहीशी आटोक्यात येताना दिसत आहे. रुग्णांच्या संख्येमध्ये 25-30 टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोंदवण्यात आले आहे. मात्र, स्वाइन फ्लूवर अद्याप पूर्ण नियंत्रण आलेले नाही. सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यू, स्वाइन फ्लूची साथ पुन्हा बळावण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये 8796 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 4648 संशयित रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात आले. त्यामध्ये 749 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, तर महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला.

महिन्यानुसार स्वाइन फ्लूची स्थिती
(सौजन्य : आरोग्य विभाग, पुणे महापालिका)
महिना     तपासणीचे रुग्ण     टॅमीफ्लू दिलेले रुग्ण      पॉझिटिव्ह
जानेवारी       1598                     748                         0
फेब्रुवारी        1193                    454                          0
मार्च             1359                    660                           0
एप्रिल           1234                    596                           1
मे                  513                    280                           1
जून               286                     200                           2
जुलै             1042                    668                        269
ऑगस्ट         1571                  1042                        476

सहव्याधींनी काळजी घ्यावी
कोरोना नियंत्रणात आलेला असताना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तीन वर्षांत प्रथमच स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांची अधिक काळजी घ्यावी, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यातील रुग्णसंख्या
26 ऑगस्ट – 26
27 ऑगस्ट – 9
28 ऑगस्ट – 10
29 ऑगस्ट – 21
30 ऑगस्ट – 15
31 ऑगस्ट – 8
1 सप्टेंबर -11
2 सप्टेंबर – 32

Back to top button