पुणे : विमानतळ आधी निश्चित केलेल्या जागेवरच: उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण | पुढारी

पुणे : विमानतळ आधी निश्चित केलेल्या जागेवरच: उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

पुणे : पुणे शहर व जिल्ह्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातील जुन्या सात गावांच्या यापूर्वी निश्चित केलेल्या जागेवरच होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे विमानतळ बारामतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार्‍या महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पुण्याच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा झाली. या चर्चेमध्ये नवीन जागेला केंद्र सरकार आणि संरक्षण विभाग यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आधीच्या सात गावांमध्ये निश्चित केलेल्या जागेला संरक्षण विभाग, विमानतळ प्राधिकरणासह सर्वप्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्याच ठिकाणी विमानतळ करावा असा विषय पुढे आला आहे.

या विमानतळासोबतच बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल लॉजिस्टिक हब) झाल्यास लाखो रोजगार तयार होतील. पुण्याला आधुनिक विमानतळ देण्याकरिता बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासह विमानतळ अशा प्रकारचा विचार समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अशाकरिता महत्त्वाचा आहे की, या संदर्भातील सर्व परवानग्या आहेत.

त्यामुळे भूसंपादन केल्यास आपण लवकर पुढे जाऊ शकू. जमीन संपादनबाबत साधारण एमआयडीसीने हे काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. सर्व लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प करणार आहोत. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनधी, सर्वपक्षीयांशी चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावू. स्थानिकांशी चर्चा करून आराखडा पाठवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

‘पुण्याचा पालकमंत्री होणार नाही?’
पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का? असे सांगितल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्याचा पालकमंत्री कोण, या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्री होण्याचा रस्ता त्यामुळे मोकळा झाला आहे. पीएमपीच्या 150 ई-बसचा लोकार्पण सोहळा आणि पुणे स्टेशन येथे ई-बस डेपोचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी दुपारी पार पडला.

त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे विविध चर्चांणा उधाण आले होते. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, माझी आणि अशोक चव्हाण यांची भेट झालेली नाही. गणपतीच्या एका ठिकाणी मी पोहोचलो, तेव्हा तेदेखील तेथे पोहोचले.

याव्यतिरिक्त त्यांची आणि माझी कुठेही विशेष भेट झालेली नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे शहरासाठी येत्या काळात मेट्रोचा विस्तार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी विविध प्रकारच्या अ‍ॅपचे आणि ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रभावी वापर निश्चित करण्यात येईल. ई-बससेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल.

Back to top button