पुणे : नाशिक फाटा ते खेड रस्ता होणार दुमजली: नितीन गडकरी यांची माहिती | पुढारी

पुणे : नाशिक फाटा ते खेड रस्ता होणार दुमजली: नितीन गडकरी यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नाशिक फाटा ते खेड रस्त्याची जुनी निविदा रद्द करण्यात आली आहे. पुणे ते नाशिक मार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन पुढील 40 वर्षांचा विचार करून आराखडा तयार केला जात आहे. आता या मार्गावर दोन मजली रस्ता केला जाणार आहे. खाली रस्ता, पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर प्रत्येकी सहा मार्गिका असणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाचे भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे.

पुणे ते शिरूर आणि अहमदनगर, औरंगाबाद या जुन्या रस्त्यावर तीन मजली रस्त्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहने त्या दिशेने वळवता येतील. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. देहूरोड ते सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अपघातांवर उपाययोजनांसाठी अतिरिक्त कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

पुणे-सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत यादरम्यानची वाहतूक कोंडी व अपघातग्रस्त ठिकाणी उपाययोजनांसाठी इलेव्हेटेड महामार्ग करण्याचे नियोजन केले जात आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे येत्या डिसेंबरमध्ये उद्घाटन करणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने विविध पर्याय द्यावेत, असे गडकरी यांनी सांगितले.

एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार
चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्य करारदेखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत आहेत.

रिंगरोडचा प्रश्नही चर्चेला
पुण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या वर्तुळाकार (रिंगरोड) रस्त्याच्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाची माहिती नितीन गडकरी यांनी घेतली आहे. पुण्याच्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 13 हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाच पर्याय सुचविण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने मुंबईत बोलावल्यास मी येईन, असे गडकरी म्हणाले.

Back to top button