पुणे : देखावे पाहण्यासाठी गर्दी; वाहतूक विभागाकडून रस्ते बंद | पुढारी

पुणे : देखावे पाहण्यासाठी गर्दी; वाहतूक विभागाकडून रस्ते बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: घरातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून पुणेकर गुरुवारी मध्य वस्तीत गणपती पाहण्यासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे देखावे पाहणार्‍यांच्या गर्दीत आता हळूहळू वाढ होत असल्याचे दिसले. बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची देखावे पाहण्यासाठी गुरुवारी गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसले. यात खास करून मानाच्या आणि प्रसिद्ध बाप्पांच्या दर्शनासाठी अनेक नागरिक आले होते. मध्य वस्तीतील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, स्वारगेट, टिळक रस्ता, याबरोबरच जंगली महाराज रस्ता परिसरात गर्दी झाली होती.

दिवसभर बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटावर आणि पालिकेच्या हौदांवर सकाळपासूनच गर्दी पहायला मिळाली, तर सायंकाळी मध्य वस्तीत देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेक नागरिक कुटुंबीयांसह गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी करताना दिसले. त्यामुळे येथील वाहतुकीवर ताण पडल्याचे चित्र दिसले. कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, म्हात्रे पूल, फर्ग्युसन कॉलेज रस्ता या मार्गांवरदेखील प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे
पहायला मिळाले.

Back to top button