कात्रज : मंत्रिमंडळात घटक पक्षांना स्थान मिळेल; महादेव जानकर यांना विश्वास | पुढारी

कात्रज : मंत्रिमंडळात घटक पक्षांना स्थान मिळेल; महादेव जानकर यांना विश्वास

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना स्थान द्यावे, असा प्रस्ताव दिला आहे. याचा ते नक्कीच विचार करतील, असा विश्वास वाटतो, ’ असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे. भारती विद्यापीठ येथील सरहद संस्थेच्या गणेशाची आरती जानकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्या वेळी ते दै. ‘पुढारी’शी बोलत होते. या वेळी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, मयूर मसूरकर, आरएसपी जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर, शहराध्यक्ष बालाजी पवार, राजेंद्र फरांदे, साहित्यिक चंद्रकांत वानखेडे आदींसह संस्थेचे शिक्षक उपस्थित होते.

‘आम्ही एनडीएमध्ये आहोत. घटक पक्षापैकी राष्ट्रीय समाज पक्ष हा एकमेव नोंदणीकृत पक्ष असून, दोन्ही सभागृहांत आमचे सदस्य आहेत. लवकरच आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याबाबत आम्हाला अपेक्षा आहेत, असेही जानकर यांनी सांगितले. तसेच, रासप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘ब्राह्मण असतो, तर पंतप्रधान असतो’
‘धनगर समाजाचा असल्याने मागे राहिलो, ब्राह्मण असतो, तर पंतप्रधान झालो असतो. आजही आपला देश जाती-पातीच्या पलीकडे जायला तयार नाही, ही शोकांतिका आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे म्हणून प्रस्ताव दिला आहे. मात्र, मागून भीक मिळते अधिकार नाही,’ असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

Back to top button