मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते येणार पुण्यातील बाप्पाच्या दर्शनाला | पुढारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते येणार पुण्यातील बाप्पाच्या दर्शनाला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळी पुण्यातील गणपती बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाप्पाच्या चरणी मस्तक टेकविण्यासाठी येणार्‍यांपैकी बाप्पा नक्की कोणाला पावणार, हे मात्र प्रत्यक्ष निकालानंतरच समजू शकणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी रात्रीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते व माजी मंत्री विश्वजित कदम यांनीही गुरुवारी रात्रीच महत्त्वाच्या गणेश मंडळांना भेट दिली. पुण्यातील गणेशोत्सव हा साता समुद्रापार प्रसिद्ध आहे. येथील गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी देशाबरोबरच परदेशातूनही भक्त पुण्यात येत असतात. त्यात राजकीय नेत्यांचीही मांदियाळी असते.

यंदा पुण्यातील बाप्पाच्या दर्शनासाठी राज्यातील आणि केंद्रातील नेते मंडळीही हजेरी लावणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, महेंद्रनाथ पांडे यांच्यासह राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. यामध्ये फडणवीस हे आज शुक्रवारीच पुण्यात येणार आहेत. ते शहरातील 8 प्रमुख गणेश मंडळांना भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री येणार असले तरी अद्याप त्यांचा दौरा निश्चित झालेला नाही, तर जयंत पाटील हे दि. 3 सप्टेंबरला; तर अजित पवार हे दि. 4 सप्टेंबर रोजी पुण्यात गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत, तर खासदार अमोल कोल्हे आज आणि खासदार सुळे हे दि. 5 ते 8 सप्टेंबर या कालावधीत दर्शनासाठी शहरात असणार आहेत. शिवसेना, काँग्रेस, मनसे यांचेही काही प्रमुख नेते बाप्पाच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्याच दिवशी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना केली. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्याच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले. एकंदरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेत आपल्याच पक्षाची सत्ता येऊ दे, अशी प्रार्थना ही नेते मंडळी बाप्पाचरणी करतील. त्याचबरोबर कार्यकत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना प्रोत्साहनही या दर्शनवारीतून करणार असल्याचे स्पष्ट आहे.

Back to top button