थेऊरच्या चिंतामणीची पूजेसह सजावट | पुढारी

थेऊरच्या चिंतामणीची पूजेसह सजावट

लोणी काळभोर : गणेश चतुर्थीमुळे थेऊर येथील चिंतामणीची पहाटे साडेपाच वाजता पुजारी विद्याधर आगलावे यांनी पूजा केली. या वेळी भाविकांनी गर्दी केली होती. वर्षातील माघ व भाद्रपद महिन्यात मोठी यात्रा भरते. चतुर्थीला पिरगुंटकर देव तसेच प्रकाश महाराज देव हिंजवडीकर यांची महापूजा झाली. भाद्रपद महिन्यात पिरंगुटकर देव पायी व्दारयात्रा करतात. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भाद्रपद प्रतिपदेला यात्रेला सुरुवात होते.

पिरंगुट गणपती देवस्थानातील अरुण महाराज देव, गणेश देव, नारायण देव, शशांक देव, प्रकाश महाराज देव, पुरुषोत्तम देव, अशोक देव सहकुटुंब उपस्थित होते. ही देव मंडळी थेऊर येथे व्दार यात्रा करतात. यात्रा प्रतिपदा ते गणेश चतुर्थी या चार दिवसात असते. चतुर्थी दिवशी अभिषेकानंतर दुपारी थेऊरचे ग्रामदैवत म्हतारीआई मातेची पूजा करून रात्री व पहाटे तीनला महासाधू मोरया गोसावी व चिंतामणी महाराज यांनी रचलेल्या पदांनी धुपार्ती झाली.

चिंतामणीच्या मूर्तीला आकर्षक दागिने पोषाख परिधान करून रात्री परंपरेप्रमाणे ‘श्रीं’चा छाबिना काढण्यात आला. मंदिरातील गाभार्‍यात फुलांची आरास करून चिंतामणीला सजवून नजर लागू नये म्हणून दृष्ट काढली. यात्रा काळात मंदिरात रात्री टिपर्‍या व गुलालाची उधळण होते. चार व्दारांमध्ये पहिले द्वार कोरेगाव मूळ येथील आसराई मातेची पूजा करण्यात आली. दुसरे व्दार आळंदी म्हातोबा येथील ओजराईदेवी, तिसरे मांजरी बुद्रुक येथील मांजराईची पूजा करण्यात आली. चौथे व्दार थेऊर येथील महातारीआई देवीची पूजा करण्यात आली.

वर्षातून दोन वेळा म्हणजे गणेश जयंती व गणेश चतुर्थीला मंदिर रात्रभर उघड ठेवले जाते. या काळात चिंतामणीचे पुजारी आगलावे बंधू यांच्या वतीने पूजा केली जाते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून संपूर्ण मंदिराला फुलांची आरास करून नयनरम्य रांगोळी मंदिर परिसरात काढली होती. रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Back to top button