पिंपरीमधील एटीएम सुरक्षा रामभरोसे

पिंपरीमधील एटीएम सुरक्षा रामभरोसे
Published on
Updated on

संतोष शिंदे : 

पिंपरी : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 67 एटीएम फोडून चोरट्यांनी कोट्यावधी रुपयांची रोकड लांबवली आहे. या पार्श्वभूमीवर 'पुढारी' प्रतिनिधीने रात्री शहरातील 'एटीएम' सुरक्षेचा आढावा घेतला. दरम्यान, शहरातील एटीएम सेंटर हे रामभरोसे असल्याचे समोर आले. तसेच, पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांकडे बँका अजूनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आतातरी बँकांना सद्बुद्धी दे रे बाप्पा! असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

67 एटीएम फोडूनही पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यापासून एटीएम सेंटर फोडण्याच्या घटना म्हणजे पोलिसांची कायम डोकेदुखी ठरली आहे. आतापर्यंत शहर परिसरातील 67 एटीएम फोडून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची रोकड लांबवली आहे. यातील काही गुन्ह्यांतील रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र, तरीही अजूनही काही घटनांमध्ये काहीच थांगपत्ता लागला नाही.
एटीएम सेंटर फोडण्याच्या या पार्श्वभूमीवर 'पुढारी'च्या प्रतिनिधीने रात्री शहरातील एटीएम सुरक्षेची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, रात्री बाराच्या ठोक्याला प्रतिनिधी घराबाहेर पडला. सुरुवातीस चिखली पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन पहिले. त्या वेळी तेथे कोणीही नव्हते. कित्येक आवाज देऊनही आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. तेथून पुढे एका एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाच्या नावाखाली नुसतीच मोकळी खुर्ची ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर, 'पुढारी' प्रतिनिधी भोसरी, मोशी भागात पाहणी करून थेट चाकणच्या दिशेने निघाला. रस्त्यात असलेल्या बहुतांश एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नव्हते. तर, काही ठिकाणी सुरक्षारक्षक आतील खोलीत जाऊन झोपल्याचे आढळले.

तळेगाव -चाकण रस्त्यावरदेखील अशीच परिस्थिती पाहावयास मिळाली. पुढे खराबवाडीच्या रस्त्यावर शांतता होती. एका ठिकाणी दुचाकीवर गस्त घालणारे पोलिस दिसून आले. तसेच, रस्त्यावरील अनेक एटीएम सेंटरचे शटर बंद असल्याचे पहावयास मिळाले. खराबवाडीचा निर्मनुष्य रस्ता काळजाचे ठोके चुकवत होता. काही वेळाने अवजड वाहनांची घरघर ऐकू येत असताना 'पुढारी' प्रतिनिधी तळवडे येथे बाहेर पडला. तळवडे येथेदेखील सर्वच एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक आणि सुरक्षा साधनांचा अभाव होता.
परिमंडळ दोनच्या हद्दीतील हिंजवडी, सांगवी आणि वाकडमध्येदेखील काही वेगळे चित्र पाहावयास मिळाले नाही. येथेदेखील आ बैल मुझे मार, अशी परिस्थिती एटीएम सेंटरची होती. काही ठिकाणी एटीएम सेंटरची दारे सताड उघडी असल्याचे पहावयास मिळाले. एकंदरीतच बँकांना एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यांचे सोयरसुतक नसून पोलिसांच्या सूचनांकडे ते गांभीर्याने पाहत नसल्याचे 'पुढारी' प्रतिनिधीच्या पाहणीत आढळले.

स्फोटकांचा वापर करण्यापर्यंत मजल
एटीएम फोडणारे चोरटे सराईत असतात. यापूर्वी पिंपरी- चिंचवड शहर परिसरात स्फोटकांचा वापर करून चोरट्यांनी एटीएम सेंटर उडवल्याच्या नोंदी आहेत. यामध्ये नक्षलवादी कनेक्शन असल्याचेदेखील सांगण्यात आले होते. तेव्हापासून रात्रीच्या वेळी एटीएम सेंटर आणि ज्वेलर्सच्या दुकानांबाहेर विशेष गस्त सुरू करण्यात आली. त्यानुसार, एटीएम सेंटर तपासणीची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे; मात्र मनुष्यबळाअभावी अशा गस्तीवर मर्यादा येतात. त्यामुळे बँकांनीदेखील एटीएम सुरक्षेसाठी एक पाऊल उचलणे गरजेचे आहे.

'त्या' तेरा मुद्द्यांचे काय ?
एटीएम फोडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व बँकांना पत्रव्यवहार करून खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. एटीएम सुरक्षेबाबत काय उपाययोजना करावी, याबाबतचे 13 मुद्दे या पत्रात नमूद करण्यात आले आहेत. मात्र, शहरातील सध्याची एटीएमची परिस्थिती पाहता बँकांनी पोलिसांच्या या पत्रांना केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
भुर्दंड नसल्याने काळजी नाही
बहुतांश बँकांनी एटीएम मशीनमध्ये कॅश भरणा आणि सुरक्षेची जबाबदारी खासगी एजन्सीकडे सोपवली आहे. त्यामुळे एटीएम फुटले, किंवा जळाले तरीही बँका काळजी करीत नाहीत. तसेच, या रकमेचा विमादेखील उतरवलेला असल्याने चोरी झाली तरीही त्याचा भुर्दंड बँक किंवा एजन्सीला सोसावा लागत नाही. त्यामुळे बँका एटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पोलिस खासगीत सांगतात.

बँकांसाठी पोलिसांच्या सूचना

एटीएम सुरक्षित व नजरेस येतील अशा ठिकाणी असावे

निर्जनस्थळी व आडोशाच्या ठिकाणी एटीएम नसावे

एटीएममध्ये चांगल्या प्रतीचे कॅमेरे असावेत. ज्यामध्ये सभोवतालचा परिसरदेखील स्पष्टपणे दिसायला हवा.

सीसीटीव्हीही सहजासहजी दिसणार नाहीत अशा ठिकाणी बसवावेत

मशीनमध्ये छेडछाड केल्यास सायरन वाजण्याची अद्यावत यंत्रणा असणे आवश्यक आहे.

एजन्सीजला सुरक्षारक्षक ठेवण्याबाबत सूचित करावे. करारनाम्यात तसे नमूद करावे

एटीएम सभोवताली पुरेशी लाईट असणे आवश्यक आहे.

एटीएम सुरक्षेसाठी शस्त्रधारी रक्षक असणे आवश्यक

एटीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्यास मोबाईलवर मेसेज येईल अशी यंत्रणा असणे आवश्यक

सुटीच्या दिवशी जास्त भरणा करू नये

एटीएममधील फुटेजची तपासणी कारवाई. ज्यामुळे गुन्हे रोखण्यास पायबंद घालता येईल

सुरक्षारक्षकाला आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी, यासाठी त्याच्याकडे सायरनसारखी यंत्रणा आवश्यक

कॅश भरणा आणि सुरक्षा एजन्सीमध्ये काम करणार्‍या सर्वांचे पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news