वालचंदनगर : अंथुर्णेत विजांच्या कडकडाटासह पाऊस | पुढारी

वालचंदनगर : अंथुर्णेत विजांच्या कडकडाटासह पाऊस

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात मंगळवारी (दि. 30) मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या परिसरात चालू वर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या परिसरात 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पावसाळा संपत आला तरी जोरदार पाऊस होत नसल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासूनचा इतिहास पाहिल्यास या भागात गणपती काळात समाधानकारक पाऊस झाल्याचे पाहिले आहे. त्यामुळे येणार्‍या दहा दिवसांच्या काळात गणराया या परिसरातील शेतकर्‍यांची आर्त हाक ओळखून सर्वत्र पाऊस पाडेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. दरम्यान बुधवारी दिवसभर परिसरात दमट वातावरण होते. त्यामुळे पुन्हा जोमदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

निमगाव केतकीत उच्चांकी पाऊस
बुधवारी मध्यरात्री तालुक्याच्या विविध भागांत पाऊस झाला असून, त्यामध्ये निमगाव केतकी येथे सर्वाधिक 102 मिलिमीटर, सणसर येथे 28 मिलिमीटर, काटी येथे 16 मिलिमीटर, भिगवण येथे 14 मिलिमीटर, लोणी देवकर येथे 9 मिलिमीटर, बावडा येथे 5 मिलिमीटर तर इंदापूर येथे सर्वात कमी 2 मिलिमीटर पाऊस झाला.

Back to top button