क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कमी दराच्या निविदा; कोथरूडमध्ये कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह | पुढारी

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कमी दराच्या निविदा; कोथरूडमध्ये कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या कामांच्या निविदा तब्बल 47 टक्के कमी दराने आल्या आहेत. एवढ्या कमी रकमेच्या निविदांमध्ये प्रत्यक्षात कामे होणार तरी कशी, आणि त्यांची गुणवत्ता राखली जाणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सिमेंट काँक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, फुटपाथ दुरुस्ती अशा विविध स्वरूपांच्या कामांसाठी 2 लाखांपासून 10 लाखांपर्यंतच्या रकमेच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.

या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या. यामध्ये जवळपास सहा ते सात कामांच्या निविदा या तब्बल 47 टक्के इतक्या कमी दराने आल्या आहेत. विशेष म्हणजे एक ते दोन ठेकेदारांचाच त्यामध्ये समावेश आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी दराच्या निविदांमध्ये पात्र ठरताना प्रत्यक्षात ठेकेदार नक्की काम तरी कसे करणार आणि अशा कामांमध्ये गुणवत्ता तरी कशी राखणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

म्हणजेच उदाहरणार्थ 2 लाखांच्या निविदांची रक्कम असेल तर प्रत्यक्षात ठेकेदार हे काम 1 लाख पाच ते दहा हजारांमध्ये कसे करू शकतो आणि त्यातून त्यांच्या हातात नक्की किती मोबदला राहणार, असाही प्रश्न आहे. त्यामुळे आता या कामांमधील निविदा प्रक्रियेबाबतच सांशकता निर्माण झाली आहे. आता कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून या निविदा मंजूर केल्या जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button