पश्चिम हवेलीत तापाची लाट; आरोग्य केंद्रात मोफत डेंग्यू तपासणी | पुढारी

पश्चिम हवेलीत तापाची लाट; आरोग्य केंद्रात मोफत डेंग्यू तपासणी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला, शिवणे, भागासह सिंहगड पश्चिम हवेलीत तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे डेंग्यू तसेच तापाची साथ रोखण्यासाठी या भागातील जिल्हा परिषदेच्या चार आरोग्य केंद्रांमध्ये मोफत डेंग्यू, मलेरिया तसेच कोविड तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, तसेच पालीकेच्या दवाखान्यांपेक्षा खाजगी रुग्णालये, दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने आरोग्य प्रशासनाने खाजगी दवाखान्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून खडकवासला, शिवणे, धायरीसह सिंहगड भागातील खानापूर, सांगरुण, मांडवी, खामगाव मावळ, डोणजे, खेडशिवापूर, आंबी भागात तापाचे रुग्ण वाढले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर खाजगी दवाखान्यातही मोठ्या संख्येने रुग्ण गर्दी करत आहेत. त्यामुळे खबरदारीसाठी आरोग्य विभागाने सिंहगड भागातील खानापूर,सांगरुण, खडकवासला व खेडशिवापुर या चार आरोग्य केंद्रात मोफत डेंग्यू तसेच इतर तापाच्या आजाराच्या मोफत तपासणी सुरू केली आहे.

उपचार केंद्रे सुरू करण्याची मागणी
धायरी, खडकवासला, नांदेड,किरकटवाडी, शिवणे, उत्तमनगर भागात जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा सुरू आहे.या भागाची लोकसंख्या जवळपास तीन लाखांहून अधिक आहे. जिल्हा परिषदेची सेवा अपुरी आहे तर पालिकेची सेवाही नाही. प्रशासनाने नांदेड, किरकटवाडी आदी ठिकाणी तातडीने उपचार केंद्र सुरू करावीत, अशी मागणी खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष राहुल घुले व शक्ती केंद्राचे अध्यक्ष सुनील हगवणे यांनी केली आहे.

खासगी रुग्णालयात मोठी रुग्णसंख्या
हवेली तालुका पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी महेश वाघमारे म्हणाले, ‘खडकवासला आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पालिकेच्या हद्दीतील खडकवासला, धायरी, नर्‍हे असा सर्व भाग आहे, तर सांगरुण आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, कोपरे परिसर आहे. या भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यामुळे तेथील रुग्णांची माहिती घेतली जात आहे. ताप, खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांची मोफत डेंग्यू, मलेरिया तसेच कोविड व इतर तपासण्या सिंहगड भागातील खानापूर सांगरुण, खडकवासला व खेडशिवापूर या चार आरोग्य केंद्रांत केल्या जात आहेत. तपासणी अहवाल त्वरित मिळत आहे.

सर्व केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा
सर्व आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. नागरिकांना सर्व उपचार मोफत आहेत. या भागात सध्या डेंग्यूचे रुग्ण नाहीत मात्र डेंग्यू सदृष्यरुग्ण आढळत आहेत. खडकवासला येथील आरोग्य केंद्रात दररोज दिडशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. गावातील खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. आरोग्य केंद्रात तसेच पुरेसे कर्मचारी नाहीत. खडकवासला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ . वंदना गवळी म्हणाल्या, ‘ताप-सर्दी’ चे रुग्ण वाढले आहेत.

Back to top button