

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या मोबाईल अॅपवर दैनंदिन प्रगतीची माहिती आता ठेकेदार अपलोड करणार आहेत.
'कंत्राटदार संघटनेने ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता येईल, दैनंदिन प्रगती निश्चित होईल आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल,' अशी माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हा परिषद ठेकेदार संघटनेची बैठक झाली. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेने पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ठेकेदारांनी समाधान व्यक्त केले. पुणे जिल्हा परिषद डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात सुरक्षा ठेव ठेवते. यापुढे आता सुरक्षा ठेव ही मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ज्या पद्धतीचा अवलंब करीत आहे, त्याच पद्धतीने हे होणार आहे. दरम्यान, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांनी लेखापरीक्षण प्रक्रिया जलद करण्यासाठी स्थानिक निधी लेखापरीक्षकांशी समन्वय साधण्याच्या देखील बैठकीत सूचना करण्यात आल्या.