पुणे जिल्ह्यात 396 गावांत ‘एक गाव – एक गणपती’ | पुढारी

पुणे जिल्ह्यात 396 गावांत ‘एक गाव - एक गणपती’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात 396 गावांत ‘एक गाव – एक गणपती’ अभियान राबविण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा
समावेश आहे. होमगार्ड, एसआरपीएफ व शीघ्रकृती दलाची पथकेदेखील असणार आहेत. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. कोरोनानंतर यंदा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाविना उत्साहात साजरा केला जात आहे.

जिल्ह्यातील तीन हजार 340 सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी आणि नागरिकांच्या पोलिसांनी बैठका घेतल्या आहेत. ‘एक गाव एक गणपत” अभियान राबविण्यात आले. त्यात 396 गावांतील गणेशभक्तांनी आपल्या गावात एकच गणपती बसवले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 31 ऑगस्ट ते 14 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

तसेच मद्यविक्री करणारी दुकाने, परमिट रूम व बिअरबार 31 ऑगस्ट 9 आणि 10 सप्टेंबर या कालावधीत दिवसभर बंद असणार आहेत, तर गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या भागात गणेश विसर्जन आहे, त्या मार्गावरील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाच दिवस सकाळी सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन सुरू असणार आहे.

त्यात तीन ते सात सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर या दिवसांचा समावेश आहे. सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष असून, समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट केली जाणार नाही, याची जबाबदारी ही ग्रुपच्या अ‍ॅडमिनची असणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

Back to top button