स्वच्छता कामगारांचा सण वेतन रखडल्याने कोरडाच; कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार | पुढारी

स्वच्छता कामगारांचा सण वेतन रखडल्याने कोरडाच; कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी स्वच्छता कामगारांचे वेतन निविदा प्रक्रियेच्या तांत्रिक बाबी राबवताना घोळ झाल्यामुळे दोन महिन्यांपासून थकीत आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील पुरुष व महिला कामगार स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करतात. महिन्याचा पगार झाल्यानंतर धान्य, किराणा व आवश्यक वस्तू त्यांच्या घरात येतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या कामगारांना जुलै महिन्याचे वेतन तर मिळालेच नाही. मात्र ऑगस्ट महिना ही पूर्ण झाला आहे. पगार कधी होणार याबाबत ठेकेदार व अधिकारी ठोस उत्तर देत नाहीत. ‘अनेकांचे घरभाडे थकले आहे. दोन महिन्यांपासून किराणा भरलेला नाही. घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. मुलांच्या शाळेची फी त्यातच गणपतीता सण सुरू झाला असून, ऐन सणासुदीत आमच्यावर ही वेळ आली आहे.

ठेकेदारांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची व्यवस्थित माहिती दिली जात नाही,’ अशी खंत आरोग्य कोठीवरील महिला सफाई कामगारांनी बोलून दाखवली. शहराची स्वच्छता पर्यायाने आरोग्य सांभाळणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळू नये, ही शोकांतिका असून कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जबाबदार अधिकारी यांच्या निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

निविदा प्रक्रियेला स्थगिती
नवीन निविदा प्रक्रिया राबवताना काही ठेकेदारांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने निर्णय देत 16 सप्टेंबरपर्यंत या निविदा प्रक्रियांवर स्थगिती दर्शविली. त्यामुळे कामगारांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पगार झाला नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय स्वच्छता कामगारांचे जुलै महिन्याचे वेतन कामगारांना मिळालेले नाही. न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा घोळ निर्माण झाला असला तरी जुलै महिन्याचे वेतन पुढील दोन दिवसांत करण्यात येईल. तशा सूचना सहायक आयुक्तांशी बोलून ठेकेदारांना देण्यात येतील.

                                       – संदीप कदम, उपायुक्त, महापालिका परिमंडळ

Back to top button