व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या तरुणाचा खून; धायरीतील प्रकार | पुढारी

व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या तरुणाचा खून; धायरीतील प्रकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दारूचे व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या दोघांची भांडणे झाले. त्या वेळी एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा टॉवेलने गळा आवळून खून केला. अजिंक्य सुरेश गुळमिरे (वय 35, रा. मेन रोड, हनुमान गल्ली, सांगोला, जि. सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.31) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धायरी परिसरात घडली. याप्रकरणी सौरभ गणेश सावळे (वय 21, रा.किष्किंधानगर, कोथरूड ) याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

‘धायरी येथील लायगुडे इंडस्ट्रियल परिसरात युनिक फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र आहे. तेथे अजिंक्य गुळमिरे व सौरभ सावळे दाखल झाले होते. घटनेच्या आदल्या दिवशी दोघांत काही कारणांवरून बाचाबाची झाली होती. तसेच, बुधवारी परत शौचालयात जाण्याच्या कारणातून दोघांत वाद झाले. त्या वेळी अजिंक्य याचा सौरभ याने गळा आवळून खून केला. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सौरभ याला ताब्यात घेतले,’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शिवीगाळ केल्याच्या रागातून चिरला गळा
शिवीगाळ केल्याच्या रागातून नर्‍हे येथील व्यसनमुक्ती केंद्रात एकाने त्याच्या सहकार्‍याचा काचेने गळा चिरून निर्घृण खून केला होता. ही घटना एप्रिल महिन्यात नर्‍हे येथीलच एका व्यसनमुक्ती केंद्रात घडली होती. तो गळा कापत असताना इतर सहकारी जागे झाले, मात्र रक्ताचे पाट वाहताना बघून सर्व जागेवरच स्तब्ध झाले होते. गळ्यावर वार केल्यानंतर माथेफिरूने त्या व्यक्तीच्या नरड्यात बोटे घालून तो फाडला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना होती.

Back to top button