पुणे : हवालदारासह दोघांना लाच घेताना पकडले; निलंबित होमगार्डसह दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : हवालदारासह दोघांना लाच घेताना पकडले; निलंबित होमगार्डसह दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करून दोन हजारांची लाच घेताना लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह दोघांना लाचलुचपतच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिस ठाण्याच्या समोरील ही कारवाई करण्यात आली आहे. मुकूंद शंकर रणमोडे (वय 49) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे, तर गजेंद्र माणिक थोरात (वय 35) हा निलंबित होमगार्ड आहे. दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या विरुद्ध न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी पोलिस हवालदार व निलंबित होमगार्डने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपयांत काम ठरले. दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाचलुचपतकडे 30 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी (दि.31) पोलिस ठाण्याच्या समोरच पथकाने सापळा रचून दोघांना लाच घेताना ताब्यात घेतले. तक्रार दाखल होताच दुसर्‍या दिवशी लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलिस उप अधीक्षक विजयमाला पवार करीत आहेत.

Back to top button