मुळशीचे पाणी बारामतीचे गणित बदलणार | पुढारी

मुळशीचे पाणी बारामतीचे गणित बदलणार

दीपक देशमुख :

यवत : मुळशी धरणातील पाणी पूर्वमुखी वळविण्यात यावे, यासाठी दौंड भाजपचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल हे आग्रही आहेत. गेली 7 वर्षे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार देखील यासाठी सकारात्मक असल्याचे कुल यांनी सांगितले. मुळशी धरणाचे पाणी भविष्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या बारामती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय गणित बदलणार असून, याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो.

मुळशीचे पाणी वळविण्यासाठी दोनवेळा अभ्यासगट तयार करण्यात आले आहेत. यात दोन्हीही वेळा आ. अ‍ॅड. राहुल कुल यांना स्थान देण्यात आले. त्यांनी योग्य भूमिका मांडली आहे. याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात असल्याने कुल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध लक्षात घेता याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुळशीचे पाणी खडकवासला प्रकल्पात आल्यास हवेली, दौंड तालुक्यांतील जिरायती भाग; पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा योजना, बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजना तसेच इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या चारही तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार मात्र भाजपच्या सत्ताकाळात पाणी आल्यास वेगळा विचार करू शकतो आणि याच गोष्टींचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.

मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती तालुक्यातील सुपे या जिरायती भागातील सर्वांत मोठ्या गावात जाहीर सभेत मुळशीचे पाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देखील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील मुळशीच्या पाण्यावर सकारात्मक भूमिका दाखवली असली, तरी कार्यवाही मात्र शून्य असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात पुन्हा भाजपप्रणीत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्याने भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पहिल्याच अधिवेशनात मुळशीच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

निर्णयाकडे लक्ष
दौंडचे भाजप आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्यासाठी भाजप बारामती लोकसभा मतदारसंघातूनच सुरुवात करू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून मुळशीच्या पाण्याबाबत राज्य सरकार मोठी घोषणा करून पवारांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणून हवेली-दौंड-पुरंदर आणि बारामतीच्या तहानलेल्या जनतेला मुळशीचे पाणी पाजणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button