

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना प्रतिबंधक लसीनंतर सिरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लस बाजारात आणली आहे. गुरुवारी (दि. 1) ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सिरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) ही स्वदेशी लस विकसित केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहे, असे वृत्त 'एएनआय' वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.
याबाबत अधिकृत सूत्रांनी माहिती दिल्याचा दावाही ट्विटमध्ये केला आहे. 15 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी 'एचपीव्ही' लस दिली जाते. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या लसींमध्ये भारतीय पर्याय नसल्याने हे लसीकरण सर्वसामान्य महिलांना परवडत नाही.
15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांना सर्वाधिक गर्भाशय कर्करोग होण्याच्या आकडेवारीत भारत हा दुसर्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही लस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच डिसेंबर 2022 पर्यंत 'एचपीव्ही' या लसीचे 1 कोटी डोस विकसित करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला दिली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीए) ने 12 जुलै रोजी 'सिरम'ला 'एचपीव्ही' लस तयार करण्यासाठी अधिकृतरीत्या परवानगी दिली होती. 'सिरम'ने तयार केलेली 'एचपीव्ही'ही लस खूप प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे.