पारगाव : बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला | पुढारी

पारगाव : बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील श्याम सुरेश भोर यांच्या भेंडीच्या शेतात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बछड्याच्या गळ्याला जखमा आढळून आल्याने भांडणात मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जाधववाडी येथील गावठाणानजीक दत्त मंदिरापुढे श्याम सुरेश भोर यांची शेती आहे.

बुधवारी (दि. ३१) सकाळी सात वाजेच्या सुमारास रेश्मा श्याम भोर या शेतात भेंडी तोडण्यासाठी गेल्या असता त्यांना मृतावस्थेत बछडा आढळून आला. त्या घाबरल्या आणि घरी परतल्या. भोर यांनी घटनेची खबर पोलिस पाटील योगेश जाधव यांना दिली. जाधव यांनी वन विभागाला ही माहिती दिल्यानंतर वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वन कर्मचारी महेश टेमगिरे घटनास्थळी हजर झाले.

मृत बछड्याच्या गळ्याला जखमा आढळून आल्याने झटापटीतच मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. येथे बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन देखील झाले आहे. आता मृतावस्थेत बछडा आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button