वेल्हे : सिंहगड भागात साथ रोखण्यासाठी तपासणी | पुढारी

वेल्हे : सिंहगड भागात साथ रोखण्यासाठी तपासणी

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड भागासह पश्चिम हवेलीत डेंग्यू तसेच तापाची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने चार आरोग्य केंद्रात मोफत डेंग्यू, मलेरिया तसेच कोविड तपासणी सुरू केली आहे. खासगी दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने आरोग्य प्रशासनाने खासगी दवाखान्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून सिंहगड भागातील खानापूर, सांगरुण, मांडवी, खामगाव मावळ, डोणजे, खेड शिवापूर, आंबी भागात तापाचे रुग्ण वाढले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण गर्दी करत आहेत. त्यामुळे खबरदारीसाठी आरोग्य विभागाने सिंहगड भागातील खानापूर, सांगरुण, खडकवासला व खेड शिवापूर या चार आरोग्य केंद्रात मोफत डेंग्यू तसेच इतर तापाच्या आजारांची मोफत तपासणी सुरू केली आहे.

Back to top button