मंचर: अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक, जिल्हा परिषदेच्या लाखणगाव शाळेतील प्रकार | पुढारी

मंचर: अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक, जिल्हा परिषदेच्या लाखणगाव शाळेतील प्रकार

मंचर, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या बाबत केंद्रप्रमुख कांताराम महादू भोंडवे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनगाव येथे इयत्ता सातवीच्या वर्गावर वर्गशिक्षक बाबाजी उमाजी घोडे हे असून, त्याने शाळेतील 13 विद्यार्थिनींच्या शरीराला वारंवार हात लावून, मुलींच्या खांद्यावर हात ठेवणे, कमरेला हात लावणे, छातीला हात लावणे, त्यांना टेबलाजवळ बोलवून त्यांना वारंवार स्पर्श करणे ,असे असभ्य वर्तन करत विकृत चाळे केले आहेत. जून 2022 पासून हा प्रकार सुरू होता. या बाबत मुलींनी घरी जाऊन पालकांना सांगितले असता, पालकांनी याबाबत 24 ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन तक्रार केली.

या तक्रारीची दखल गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी घेत पालकांशी संवाद साधला. पालकांनी याबाबत सर्व माहिती दिली. याबाबत पठारे यांनी एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. या समितीने शाळेतील अठरा मुलींची चौकशी केली असता, त्यातील 13 मुलींबाबत हा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या शिक्षकास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे करत आहेत.

आंबेगावातील घटना धक्कादायक : आयुष प्रसाद

‘आंबेगाव तालुक्यात पॉस्कोची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आम्हाला तक्रार मिळाली आणि तत्काळ निलंबनाच्या सूचना केल्या आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यांनी सांगितले. आयुष म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेच्या जनजागृती मोहिमेत 74,000 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. कौटुंबिक हिंसाचार आणि बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आम्ही गावपातळीवर समित्या स्थापन केल्या. या उपायांमुळे मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे आणि अशा गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. प्राथमिक पडताळणीनंतर आम्ही प्रत्येक प्रकरणात कठोर कारवाई केली आहे. आम्ही प्रत्येक सरकारी आणि खासगी शाळांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय मजबूत करण्यासाठीदेखील काम करत आहोत.’
शिक्षकावरील आरोपामुळे शिक्षकाचे निलंबन करण्याचे आदेश गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिले आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र काम करावे. मुलांना मारहाण व इतर गैरप्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन पठारे यांनी केले आहे

Back to top button