आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनास बंदी | पुढारी

आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनास बंदी

आळंदी, पुढारी वृत्तसेवा: आळंदी देवाची (ता. खेड) येथील इंद्रायणी नदी घाटावर गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान इंद्रायणी नदी घाट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणेकामी आळंदी नगरपरिषद व पोलिस प्रशासनामार्फत इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मूर्ती विसर्जनाकरिता घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मूर्ती विसर्जनाकरिता भाविकांना नदी घाटाच्या दोन्ही बाजूस नगरपरिषद वाहनतळ व इंद्रायणीनगर कमानीसमोर मूर्ती संकलन व विसर्जन केंद्राची व्यवस्था करून दिली आहे.

केवळ या दोनच ठिकाणी विसर्जनाकरिता आलेल्या मूर्ती स्वीकारण्यात येतील. भाविकांनी आपल्या मूर्ती तसेच निर्माल्य व पूजा साहित्य संकलन केंद्रातच जमा करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत नदीघाटावर बॅरिकेड्स लावून नदीघाट बंद ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

Back to top button