मंचर : सीएनजी वाहतूक करणारा टेम्पो उलटला | पुढारी

मंचर : सीएनजी वाहतूक करणारा टेम्पो उलटला

मंचर : पुढारी वृत्तसेवा : मंचर-पारगाव कारखाना रस्त्यावर अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत धोकादायक वळणावर सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो मंगळवारी (दि. 30) पहाटे पलटी झाला. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून टेम्पोचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. गॅस वाहतूक करणार टेम्पो (एमएच 14 केए 2830) हा जातेगाव (ता. शिरूर) येथून मंचर मार्गे घोडेगावच्या दिशेने जात होता. या वेळी अवसरी बुद्रुक येथील डॉ. मांदळे हॉस्पिटलच्या वळणावर टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला.

नशीब बलवत्तर म्हणून टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला. गॅस वाहतूक करणारा टेम्पो क्रेनच्या मदतीने बाहेर
काढण्यात आला. गावडेवाडी फाटा ते अवसरी बुद्रुक या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्ड्यातून मार्ग काढून वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मुक्ताई मंदिर ते अवसरी बुद्रुक या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. तसेच एस्सार पेट्रोल पंप ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर खडी पांगवली आहे. असे असताना मांदळे हॉस्पिटल ते कुंभारवाडा धोकादायक वळणावर कठडे उभारणे गरजेचे आहे.

Back to top button