पिंपरी : तीन हजार 700 दिव्यांगांचे सर्वेक्षण पूर्ण | पुढारी

पिंपरी : तीन हजार 700 दिव्यांगांचे सर्वेक्षण पूर्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 3 हजार 700 इतक्याच दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. शहर हद्दीतील एकूण 8 हजार 60 इतक्या दिव्यांग व्यक्तींच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा निम्म्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे आता यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 डिसेंबर 2021 च्या निर्णयानुसार, दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्याबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार महापालिकेने सोशल मिडिया, ऑडिओ, व्हिडिओ व अन्य विविध माध्यमांचा वापर करून त्याबाबत प्रसिद्धी केली होती. महापालिका समाज विकास विभागाकडून 10 मे ते 15 जून या कालावधीत दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिर आयोजित करण्यात आले.

अन्यथा आर्थिक लाभ बंद होणार

शहरात दिव्यांग व्यक्तींची एकूण लोकसंख्या 8 हजार 60 एवढी आहे. त्यापैकी आजअखेर 3 हजार 700 इतक्या व्यक्तींनीच दिव्यांग सर्वेक्षण केल्याचे दिसून येत आहे. समाज विकास विभागाकडून 31 सप्टेंबरपर्यंत दिव्यांग व्यक्तींनी सर्वेक्षण करावे अन्यथा आर्थिक लाभ बंद करण्यात येईल, असे आवाहन यापूर्वी केले होते. तरीही अद्यापपर्यंत उर्वरित 4 हजार 360 दिव्यांग व्यक्तींनी सर्वेक्षणात भाग घेतल्याचे दिसत नाही. या दिव्यांग व्यक्तींना सर्वेक्षण करुन घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत त्यांनी सर्वेक्षण केले नाही तर त्यांचे देण्यात येणारे आर्थिक लाभ बंद करण्यात येईल, असे समाज विभागाचे सहाय्यक आयुक्त (दिव्यांग कक्ष) श्रीनिवास दांगट यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button