पिंपरी : रसरंग चौक रस्त्याचा अर्बन स्ट्रीट आराखडा करणार | पुढारी

पिंपरी : रसरंग चौक रस्त्याचा अर्बन स्ट्रीट आराखडा करणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका सभा, स्थायी समिती आणि विधी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी मंजुरी दिली. प्रभाग क्र.9 मधील रसरंग चौक ते म्हाडा कॉर्नर रस्ता अर्बन स्ट्रीट आराखडा करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 31 लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. त्यास मान्यता दिली आहे. स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 6 कोटी 68 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना यावेळी मान्यता देण्यात आली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांमध्ये कामांच्या नावात बदल तसेच तरतूद वर्गीकरणाच्या विषयांचा समावेश होता. स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना मान्यता देण्यात आली. ग प्रभागातील स्मशानभुमीमध्ये गॅस दाहिनी करीता गॅस कनेक्शन घेण्याकामी एम. एन. जी.एल. यांना 13 लाख रुपये अदा करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 8 मधील वैष्णव माता शाळेसमोरील मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. तसेच योगा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 58 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ह प्रभागामध्ये मातीचे ट्रॅक किंवा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. त्यास अनुसरुन विद्युत व स्थापत्यविषयक कामे करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी येणार्‍या 84 लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

प्रायमरी डाटा सेंटरसाठी 49 लाख
महानगरपालिकेचे अद्ययावत प्रायमरी डाटा सेंटर कार्यान्वित ठेवण्यास तसेच त्यासाठी एक वर्ष कालावधीकरिता 49 लाख रुपये खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन आकुर्डी रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय येथील ऑथोरायझेशन फी आणि कन्सेंट परवाना रजिस्ट्रेशन फी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 12 लाख रुपये अदा केले जाणार आहेत.

Back to top button