पुणे : करंजेपुल ग्रा.पं.चा विधवा प्रथा बंदचा निर्णय | पुढारी

पुणे : करंजेपुल ग्रा.पं.चा विधवा प्रथा बंदचा निर्णय

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा : करंजेपुल (ता. बारामती) ग्रामपंचायतीत सोमवारी (दि. 29) पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात केला. याशिवाय निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेतीव्यवसाय धोक्यात येईल, यावरही ग्रामसभेत निर्णय घेऊन अस्तरीकरणविरोधात ठराव करण्यात आला.

चार दिवसांपूर्वीच जवळच असलेल्या वाघळवाडी ग्रामपंचायतीनेही विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पश्चिम भागातील करंजेपुल ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

सरपंच वैभव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या ग्रामसभेत निरा कालवा अस्तरीकरणविरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवली. विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव देखील करण्यात आला. अस्तरीकरण झाले तर विहिरींचे पाणी कमी होईल आणि शेतीव्यवसाय धोक्यात येईल, असे शेतकर्‍यांनी ग्रामसभेत सांगितले. पाणी असून देखील शेतीला व गावच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींना पाणी राहणार नाही. पाणी संकट निर्माण होण्याचा धोका संभवत असताना करंजेपुल ग्रामस्थांनी कोणताही राजकीय विषय न करता एकजुटीने अस्तरीकरण करण्यास विरोध दर्शविला आहे.

या वेळी करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड, ‘सोमेश्वर’चे माजी संचालक बाळासाहेब गायकवाड, उपसरपंच अजित गायकवाड, ग्रामसेविका सुजाता आगवणे, नीलेश गायकवाड, अ‍ॅड. गणेश आळंदीकर, सैनिक बाळासाहेब गायकवाड, महेश शेंडकर, शिवाजी शेंडकर, लिपिक श्रीकांत शेंडकर, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button