भामा आसखेड/राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : बांधलेल्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत प्रशासन करीत नसल्याचे कारणावरून वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील एक अपंग व्यक्ती मोबाईल टॉवरवर चढला. ग्रामस्थांसह पोलिसांनी खाली येण्याची विनंती केल्यानंतर तीन तासाने अपंग टॉवरवरून खाली उतरला. वाकी बुद्रुक येथील जीवन टोपे हे एका हाताने अपंग असून त्यांना जिल्हा परिषदेच्या यशवंत अपंग घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी 1 लाख रुपये मंजूर झाल्याने टोपे यांनी सहा महिन्यांपूर्वी घरकुल बांधले आहे. बांधलेल्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर आठला व्हावी, यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला.
परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाकडून नोंद होत नसल्यामुळे टोपे यांची मनस्थिती बिघडली. ग्रामपंचायत प्रशासन घरकुलाची नोंद करीत नसल्याने टोपे हे ग्रामपंचायत जवळील मोबाईल टॉवरवर चढले. एका हाताने अपंग असतानादेखील टॉवरच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. त्यानंतर चाकण पोलिस ठाण्यातील कर्मचारी दाखल झाले. ग्रामपंचायत कार्यालयात येऊन पंचायत समितीत गेलेले ग्रामसेवक तात्काळ कार्यालयात आले. तीन तास अपंग टोपे टॉवरवर लटकून होते.
एका हाताने अपंग असल्यामुळे कदाचित हात निसटला असता, तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती. तीन तास पाणी किंवा अन्य नसल्याने माणसाला चक्कर येऊ शकते. ग्रामस्थांसह पोलिसांनी विनंती केल्यानंतर टोपे खाली उतरले.
मला न्याय मिळावा
टोपे यांना विचारले असता घरकुलाची नोंदणी करण्याचा अर्ज ग्रामपंचायतकडे दिला. तसेच माझे घर रस्त्यालगत असल्याने स्टॅम्प पेपरवर तसे लिहून दिले आहे. घरकुल नोंदणीसंबंधी मला येथील ग्रामसेवकाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. मी एका हाताने अपंग असून माझ्या घरकुलाची नोंद करावी, एवढीच माझी अपेक्षा असून मला न्याय मिळावा, असे जीवन टोपे म्हणाले.