ताथवडे : गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशा पथक सज्ज | पुढारी

ताथवडे : गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशा पथक सज्ज

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : गणरायाचे आगमन बुधवारी (दि. 31) होत आहे. त्यामुळे सर्वांच्या लाडक्या गणेशाच्या आगमनाच्या तयारीसाठी ताथवडे, पुनावळे परिसरातील ढोल-ताशे पथक सज्ज झाले असून, त्यांची तयारीही अंतिम टप्प्यात आलेली आहे.
गेली दोन वर्षे कोरानामुळे या उत्सवावर विरजण पडले होते. गेल्या वर्षी साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्यात आलेली होती. त्यामुळे बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी ढोल पथकांना प्राधान्य दिलेले होते.

परंतु, मोजक्याच गणेशोत्सव मंडळांनी गेल्या वर्षी मिरवणूक काढलेल्या होत्या. यंदा मात्र, सरकारनेही कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल केल्यामुळे धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी कंबर कसली आहे.
आपल्या आवडत्या गणेश बाप्पाच्या आगमनावेळी ढोल पथकांचा आवाज घुमणार आहे. यासाठी ढोल पथकाची तयारीही पूर्ण झाली आहे. नवनवीन चालीवर वाद्य वाजवून गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न पथकांकडून केला जात आहे. यासाठी गेले दोन महिने सराव सुरू आहे. सरावात तरुण-तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. आपले रोजची दिनचर्या, कॉलेज, काम सांभाळून एक छंद आवड म्हणून तरुण या पथकांकडे आपसूकच वळला जात आहे.

Back to top button