सासवड : पुरंदर, जनाईसह सर्व उपसा योजनांचा वीजदर पूर्ववत

सासवड : पुरंदर, जनाईसह सर्व उपसा योजनांचा वीजदर पूर्ववत
Published on
Updated on

सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ मैदानावर पुरंदरवासीयांच्या साक्षीने राज्यातील जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पाळला. उपसा सिंचन योजनांचा बेसुमार वाढलेला वीजदर कमी करून शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या 19 टक्के रकमेत पाणी देण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत शासन आदेश काढत वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय जारी केल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशी, आंबोडी, सिंगापूर, वनपुरी, गुर्‍होळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, पारगाव, खानवडी, राजेवाडी, टेकवडी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, बेलसर, माळशिरस, मावडी, पिंपरी, पिसर्वे, नायगाव, कोथळे, रानमळा, पांडेश्वर, रोमनवाडी, अशा अनेक गावांतील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिवतारे म्हणाले. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी उपसा सिंचन योजनांचा वीजदर 1 रुपये 16 पैसे प्रतियुनिट करून अवघ्या 19 टक्के दरात राज्यभरातील शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून दिले होते.

शेतकर्‍यांच्या पाणीपट्टीची उर्वरित 81 टक्के रक्कम शिवतारे यांनी राज्यातील कारखान्यांवर लादली होती. मात्र, पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वीजदर 1.16 वरून 3 रुपये 69 पैसे इतका वाढविला होता. जुन्या दराने शेतकर्‍यांना प्रतिदशलक्ष घनफूट पाण्यासाठी साधारणतः 12 हजार रुपये खर्च येत होता. पण, अचानक वीजदरात केलेल्या वाढीमुळे हा खर्च 33 हजार रुपये प्रतिदशलक्ष घनफुटापर्यंत गेला. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यकाळात झालेली ही वाढ आता शिंदे सरकारने रद्द करून पुन्हा शेतकर्‍यांना दिलासा दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

पूर्व पुरंदरच्या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण
वीजदर पूर्ववत केल्यानंतर पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः पूर्व भागातील शेतकर्‍यांमध्ये आज आनंदाचे वातावरण होते. याबाबत बोलताना वाघापूर येथील नितीन कुंजीर म्हणाले की, शिवतारे यांच्या मागणीला उचलून धरत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा या भागातील सर्व शेतकर्‍यांसाठी आनंददायी आहे. शिंदे सरकार हे खर्‍या अर्थाने जनतेचे सरकार आहे, हेच यातून दिसून आले आहे, असेही कुंजीर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news