पिंपरी : खासगी वाहनांवर होणार कारवाई | पुढारी

पिंपरी : खासगी वाहनांवर होणार कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सव आणि गौरीपूजन सणासाठी शहरातून राज्याच्या कानाकोपर्‍यात जाणार्‍या भाविकांची संख्या अधिक आहे. अशा काळात खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने 27 वाहनांची तपासणी केली आहे. तसेच अशी वाहने आणि बुकिंग स्टॉलवर कारवाई करणार असल्याचे आदेशही दिले आहेत. शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सव आणि गौरीपुजन सणासाठी बर्‍याच नागरिकांना आपल्या गावाची ओढ लागते.

मात्र शहरातील खासगी वाहन चालक नागरिकांच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेताना दिसतात. बर्‍याच खासगी वाहनांची तिकीटे दामदुप्पट दराने विकली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. म्हणून याविरोधात शहरातील आरटीओ विभागाने तपासणी सत्र सुरू केले आहे. त्याबाबत शहरातील प्रत्येक बुकिंग स्टॉलला सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

तिकीट दरवाढीचा नियम
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीटापेंक्षा दीड पट भाडे वाढ खासगी वाहन आकारू शकतात. मात्र यांहून अधिक भाडे आकारणार्‍या वाहनांवर आणि तिकीट बुकिंग स्टॉलवर आरटीओ कारवाई करू शकते.

Back to top button