पुणे : मंडळांचा बाप्पाही येणार जल्लोषात!

पुणे : मंडळांचा बाप्पाही येणार जल्लोषात!
Published on
Updated on

पुणे : ढोल-ताशांचा गजर… नगारा अन् सनई-चौघड्यांचे सूर… बँड पथकांचे वादन… पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीत बाप्पाची मिरवणूक अन् उत्साह, जल्लोषात दोन वर्षांनंतर पुणेकरांना मानाचे पाच गणपती आणि प्रमुख गणपती मंडळांच्या गणरायाची मिरवणूक अनुभवता येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत गणरायाच्या मूर्तींची विधिवत अन् पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना होणार असून, तत्पूर्वी मिरवणुका निघणार आहेत. कार्यकर्त्यांसह पुणेकरांमध्ये कमालीचा आनंद असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यातील मिरवणुकीत पुणेकरांना सहभागी होता येणार आहे.

मानाचे पाच गणपती

मानाचा पहिला : श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
प्रतिष्ठापनेची वेळ – सकाळी 11 वाजून 37 मिनिटे हस्ते : हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील आणि धैर्यशील राजगुरू तत्पूर्वी, सकाळी 8.15 वाजता गणरायाच्या मूर्तींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघेल. मिरवणुकीत नगारावादन असून संघर्ष, वाद्यवृंद, श्रीराम पथक आणि प्रभात बँड मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
प्रतिष्ठापनेची वेळ – दुपारी 12.30 हस्ते – कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे व मीरा काळे चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या 'श्रीं'च्या आगमनाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून कुंटे चौक, गणपती चौकमार्गे उत्सव मंडपात पोहचेल. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक, आम्ही गोंधळी गोंधळी संबळ पथक सहभागी होणार आहे.

मानाचा तिसरा : गुरुजी तालीम मंडळ
प्रतिष्ठापनेची वेळ – दुपारी 2 वाजून 10 मिनिटे हस्ते – उद्योजक पुनीत बालन
व जान्हवी बालन गणरायाच्या आगमनाची मिरवणूक गणपती चौकातून सुरू होईल. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक ते गणपती चौक मंडप या मार्गावरून मिरवणूक निघेल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अतुल बेहरे यांचे महिलांचे नादब्रह्म पथक, गर्जना पथक, गुरुजी प्रतिष्ठान, श्री ढोल-ताशा पथक (येरवडा), समर्थ प्रतिष्ठान, नादब्रह्म ट्रस्ट पथक यांचा समावेश आहे. सुभाष सरपाले आणि स्वप्निल सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या रथातून मिरवणूक निघेल.

मानाचा चौथा : श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट
प्रतिष्ठापनेची वेळ – दुपारी 2.30 हस्ते – उद्योजक पुनीत बालन व जान्हवी बालन
सकाळी 11 वाजता 'श्रीं'ची मिरवणूक गणपती चौक, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक ते गणपती चौकमार्गे उत्सव मंडपात पोहचेल. या मिरवणुकीत शिवगर्जना, समर्थ प्रतिष्ठान, उगम ही पथके सहभागी होणार आहेत. स्वानंदलोक महालाची सजावट सरपाले बंधूंनी केली आहे.

मानाचा पाचवा : केसरीवाडा
प्रतिष्ठापनेची वेळ – सकाळी 10.30 हस्ते – डॉ. रोहित टिळक
सकाळी 10 वाजता रमणबाग चौक ते केसरीवाड्यापर्यंत चांदीच्या पालखीत 'श्रीं'ची मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत श्रीराम पथक, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक आणि बिडवे बंधूंचे नगारावादन होणार आहे.

प्रमुख गणपती मंडळे

अखिल मंडई मंडळ
प्रतिष्ठापनेची वेळ – दुपारी 12, हस्ते – श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा शारदा-गजाननाची आगमन मिरवणूक फुलांनी सजलेल्या मंगल कलश रथातून सकाळी 9 वाजता निघणार आहे. शारदा-गजानन मंदिरापासून मिरवणूक निघून मंडई पोलिस चौकी ते रामेश्वर चौकापर्यंत जाऊन पुन्हा मंडई पोलिस चौकीमार्गे उत्सव मंडपात येणार आहे. रंगीबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर शारदा-गजानन विराजमान होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
प्रतिष्ठापनेची वेळ – सकाळी 11 वाजून 37 मिनिटे
हस्ते – गुजरात गिरनार येथील गुरू दत्तात्रेय पीठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून गरुडरथातून 'श्रीं'ची आगमन मिरवणूक काढण्यात येईल. मुख्य मंदिर, आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
प्रतिष्ठापनेची वेळ – दुपारी 12.15
हस्ते – राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
प्रतिष्ठापना मिरवणुकीची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता होईल. भाऊसाहेब रंगारी भवन, बुधवार चौक, आप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरापर्यंत मिरवणूक निघेल. जगदंब, सामर्थ्य, अभेद्य, वाद्यवृंद, चेतक, कलावंत आणि श्रीराम वाद्य पथक यात सहभागी होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news