पिंपरी : मोडकळीस आलेल्या इमारती पाडा, जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी | पुढारी

पिंपरी : मोडकळीस आलेल्या इमारती पाडा, जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, शहरातील मोडकळीस आलेल्या, खासगी आणि महापालिकेच्या इमारती तत्काळ पाडण्यात याव्यात, रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावेत, आदी सूचना जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी केल्या. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी (दि. 29)झालेल्या जनसंवाद सभेत 64 नागरिकांनी तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 18, 8, 3, 6, 7, 3, 12 आणि 7 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद अनुक्रमे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम यांनी भूषवले. जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी केल्या. जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी खोदण्यात येऊ नये, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. खोदण्यात आलेल्या धोकादायक ठिकाणी बॅरीगेट्स लावण्यात यावेत, पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा.

जलवाहिन्यांचे अर्धवट असलेले काम तातडीने पूर्ण करावे, उघड्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांवर कारवाई करावी, पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे. नागरिकांच्या सेवेसाठी पूर्वी सुरू असलेल्या मार्गांवर पुन्हा पीएमपीएमएल बस सेवा सुरू करावी, चेंबरमधून गटारीचे पाणी रस्त्यांवर येत असल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे.चेंबर, नाले वेळोवेळी स्वच्छ करण्यात यावेत, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, सार्वजनिक गणेश मंडळांनी नागरिकांना रहदारीस तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतची अट पालिकेने ठेवावी, अशी सूचना नागरिकांनी केल्या.

Back to top button